पुणे : सध्या पुणे जिल्ह्यातील ग्रामिण भागामध्ये स्वयंघोषित बोगस पत्रकारांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाला आहे. ना कोणती अधिकृत मान्यता ना कोणते शासकीय वृत्तपत्र मात्र रुबाब असा की मेन्स्ट्रीम मिडिया सुद्धा लाजेल. वाळू, मुरूम, माती, गुटखा, मटका आणि पैशाचा खटका या व्यतिरिक्त सर्वसामान्य जनतेचे प्रश्न माहित नसलेली स्वयंघोषित खंडणी रुपी ब्लॅकलिस्ट पत्रकारिता सध्या स्वयंघोषित लोकांनी सुरु करून खऱ्या पत्रकारितेला काळिमा फासल्याचे दिसत आहे.
जो तो स्वतःच्या नावापुढे जर्नलिस्ट, पत्रकार अशी उपाधी लावून फिरत आहे. शाळेत बारावीचे सुद्धा शिक्षण झाले नसताना, जर्नालीजम ची कोणती डिप्लोमा, डिग्री घेतली नसताना हे महाभाग स्वतःला जर्नलिस्ट म्हणवतात. पत्रकारितेचे अवाक्षर माहित नसताना, बातमी लिहायची अथवा दाखवायची कोणतीच अक्कल नसताना आणि जर्नालीजमचा ‘ज’ सुद्धा येत नसणारं आणि कालपर्यंत गल्ली बोळात टुकारक्या करीत मारहाण करत फिरणारं कार्ट आज बोगस चॅनेल चे प्रेस आयकार्ड गळ्यात घालून लोकांवर मी पत्रकार असल्याचा रुबाब करू लागल्याने खऱ्या पत्रकारितेचे धिंडवडे निघू लागले आहे.
खरे पत्रकार कोण..? भारत सरकारने वृत्तपत्रासाठी RNI आणि टीव्ही न्यूज साठी MIB हे दोन खास विभाग तयार केले आहेत. यासाठी दोन केंद्रीय मंत्रालय नेमलेले असतात. या विभागामधून ज्या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनेल्सना लायसन दिले जाते तेच अधिकृतपणे बातम्या प्रसिद्ध करतात आणि जे या अधिकृत वृत्तपत्र, मीडियाकडे काम करतात त्यांना प्रेस आयकार्ड, मिडिया आयकार्ड त्या त्या संस्थेकडून दिले जाते. ही दोन अधिकृत विभागे सोडली तर आज जे युट्युब आणि पोर्टलवर स्वयंघोषित प्रेस आणि मिडिया न्यूज चॅनेल्स म्हणून प्रेस आयकार्ड घालून मिरवत आहेत त्यांना प्रेस चे आयकार्ड तयार करण्याचा आणि ते घालून लोकांमध्ये मिरविण्याचा कोणताच अधिकार नाही. प्रेस आयकार्ड छापण्यासाठी भारत सरकारचे वृत्तपत्र रजिस्ट्रेशन आवश्यक असते मात्र हे बोगस लोक याकडे दुर्लक्ष करून एखादे msme चे रजिस्ट्रेशन दाखवून लोकांची अक्षरशः दिशाभूल करत असल्याचे समोर आले आहे.
अधिकृत वृत्तपत्र आणि चॅनेल्स कसे ओळखाल – अधिकृत वृत्तपत्र हे भारत सरकारने नेमून दिलेल्या सर्व अटी आणि शर्तीचे पालन करते. वृत्तपत्र अथवा न्यूज चॅनेल्सला नाव देताना ते भारत सरकारकला दाखवावे लागते आणि त्यानंतर जे त्यांच्याकडून नाव अधिकृत केले जाईल तेच नाव वृत्तपत्र अथवा चॅनेल्सला दिले जाते. संपूर्ण देशात एका वृत्तपत्राला, चॅनेल एकच नाव दिले जाते ते नाव अन्य कोणत्याही वृत्तपत्र अथवा चॅनेल्सला वापरता येत नाही अथवा दिले जात नाही. (यात काही ठिकाणी अपवाद असू शकतात,मात्र हीच पद्धत आत्तापर्यंत वापरली गेली आहे) या अधिकृत वृत्तपत्रने छापलेली प्रत्येक बातमी ही दिल्लीच्या RNI ऑफिसला त्यांनी नेमून दिलेल्या रकाण्यात, वृत्तपत्राच्या छापील पद्धतीने पाठवावीच लागते अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाते. हीच पद्धत न्यूज चॅनेल्सला लागू असून त्यांनी प्रसिद्ध केलेली प्रत्येक न्यूज ही व्हिडीओ स्लॉटच्या माध्यमातून MIB ला द्यावी लागते. मात्र ज्यांना पत्रकारिता अथवा न्यूज चॅनेल्सची मान्यताच नाही ते यातील कोणत्याच गोष्टीचे पालन करत नाहीत. ते बोगस असतात त्यामुळे त्यांना या अधिकृत पद्धतीमध्ये भाग घेता येत नाही. त्यांनी केलेले चुकीचे कृत्य हे थेट न्यायालयात खेचण्याइतके गंभीर असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना नायालयात ओढू शकता तेथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल.
फेक न्यूज पोर्टल, चॅनेल्स – एकाच नावाची अनेक बोगस युट्युब चॅनेल, न्यूज पोर्टल आपण पाहू शकतो कारण त्यांना अधिकृतपणे नाव मिळाले नसल्याने ते लोकांची दिशाभूल करण्यासाठी मनाला वाट्टेल ते नाव देतात आणि त्यामुळे एकाच नावाने अनेक चॅनेल्स आपल्याला सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पहायला मिळतात. अधिकृत वृत्तपत्र आणि चॅनेल्स आपले बातमीचे कंटेन्ट इंटरनेटवर अपलोड करतात कारण त्यांच्याकडे बातमीदारीचे मुख्य लायसन असते. बोगस मात्र मनाला वाट्टेल ते कंटेन्ट आणि बातमी प्रसिद्ध करून लोकांना ब्लॅकमेल करू पाहतात आणि त्यांच्याकडून खंडणी उकळतात, कारण त्यांचा मुख्य उद्देश हा बातमीदारी नसून अनधिकृतपणे पैसा उकळणे हाच असतो.
थेट पोलिसांत तक्रार करा.. त्यामुळे जर तुमच्याकडे कोणी पत्रकार किंवा बूमधारी मिडियाकर्मी आला आणि तो तुम्हाला उगच आडवे तिडवे प्रश्न विचारू लागला तर सर्वात प्रथम त्याचे प्रेस आयकार्ड तपासा. त्यानंतर तो कोणत्या वृत्तपत्राला अथवा चॅनेल्सला काम करतो याची त्याला माहिती विचारा आणि तो अधिकृत आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी त्याला RNI चे लायसन्स (RNI चा अधिकृत रजिस्ट्रेशन नंबर विचारा, नुसता टायटल कोड नाही तर रजिस्ट्रेशन नंबर विचारा) तसेच जो न्यूज चॅनेल आहे असे म्हणत असेल त्याला त्याचे MIB चे मेन्स्ट्रीम मिडीयाचे, सॅटेलाईट चॅनेलचे लायसन्स दाखवायला सांगा आणि जर ती व्यक्ती यापैकी तुम्हाला काहीच दाखवत नसेल तर त्याच्या वायफळ प्रश्नांना उत्तरे देत बसू नका आणि तरीही तो त्रास देत असेल तर थेट पोलिसांना 112 वर संपर्क साधून त्याची तक्रार करा.
घाबरू नका, तक्रार करा – लक्षात घ्या तुमची भीती हीच त्यांची ताकद असते त्यामुळे अश्या भुरट्या स्वयंघोषित पत्रकारांना अजिबात घाबरू नका आणि त्यांना न्यायालईन पद्धतीने तुम्ही योग्य धडा शिकवू शकता हे लक्षात घ्या. या बातमीचा मुख्य उद्देश हा बोगस, खंडणीखोर, ब्लॅकमेलिंग पत्रकारिता रोखने हा असून समाजासाठी झटणाऱ्या आणि समाजाभीमुख पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांसोबत आम्ही सदैव सोबत असू हे आम्ही आवर्जून येथे नमूद करू इच्छितो. (क्रमशा…)