अख्तर काझी
दौंड : दौंड शहरातील मुस्लिम समाजाच्यावतीने दौंड चे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांचा सत्कार करण्यात आला असून त्याला कारणही तसेच आहे. शहरात मुस्लिम बांधव बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करतात. ईदच्या निमित्ताने नगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्वच मशिदींच्या परिसराची स्वच्छता करण्यात येते. यंदाची बकरी ईद 7 जूनला साजरी करण्यात येणार आहे. ईदची तारीख जवळ येऊन सुद्धा जामा मशीद परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता झाली होती, त्याचा मोठा त्रास मशिदीत येणाऱ्या भाविकांना होत होता.
याच दरम्यान दौंड चे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन केले. बैठकीमध्ये मुस्लिम बांधवांनी जामा मशीद परिसरातील घाणीची समस्या सोडविण्याबाबत पवार यांना विनंती केली होती तसेच या परिसरात सीसीटीव्ही उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली होती. त्यामुळे गोपाळ पवार यांनी स्वतः जामा मशीद परिसराची पाहणी करून येथील परिस्थितीचा आढावा घेतला व नगरपालिकेला, ईद च्या आधी हा परिसर स्वच्छ करण्याच्या व या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.
नगरपालिकेने या सूचनांची गांभीर्याने दखल घेत जामा मशिदीचा संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेतला व त्या ठिकाणी सीसीटीव्ही सुद्धा उपलब्ध करून दिला आहे. गोपाळ पवार यांनी पुढाकार घेत मुस्लिम समाजाच्या समस्या सोडविल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने, जामा मशिदीचे मौलाना मुबीन आतार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानण्यात आले. बाबा करीम शेख, मतीन शेख, खलील सय्यद,राजू शेख, गफार पानसरे, शाहिद शेख आदी उपस्थित होते.