आई आणि दोन चिमुरड्यांचा निर्घृण खून, ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून छायाचित्र प्रसिद्ध

अब्बास शेख

पुणे : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. एका महिलेबरोबरच दोन बालकांचे मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे, मात्र अजूनही या मृतदेहांची ओळख पटली नसल्याने रांजणगाव पोलिसांकडून मृत महिला आणि मुलांचे स्केच तयार करण्यात येऊन ते प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हे आहे त्या मृत आई आणि एका मुलाचे स्केच

शिरूर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळ रांजणगाव हद्दीत आर.के हॉटेलच्या पाठीमागे एक महिला आणि तिच्या दोन लहान मुलांचा अज्ञात व्यक्तीने खून करून त्यांचे मृतदेह अर्धवट जाळले होते. यातील मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून तिच्या दोन्ही मुलांपैकी एकाचे वय अंदाजे दिड वर्षे आणि दुसऱ्याचे चार वर्षे इतके आहे. पोलिसांना घटनास्थळावरून काही पुरावे सापडले असून या निर्घृण हत्याकांडामागील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत आहेत.

असा आहे पेहराव –  या प्रकरणातील मृतदेहांचे चेहरे ओळखू न येण्यासारखे आहेत, मात्र महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र, हातावर जयभीम गोंदलेलं असून उजव्या हाताच्या मनगटावर बदाम आणि Mom, Dad असे इंग्रजीत गोंदलेले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला भेट देऊन तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी ज्या नागरिकांनी भेट दिली त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता, मृत महिला आणि तिला बिलगलेली दोन छोटी लहान मुले पाहून अनेकांना रडू कोसळत होते. मृतदेहांची अद्यापही ओळख पटत नसल्याने तपासासाठी आता स्थानिक यंत्रणांची मदत घेतली जात आहे. अधिक तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.