दौंड : दिनांक २६.०५.२५ रोजी श्रीमती ताराबाई विश्वचंद आहिर (वय ७५ वर्षे रा.दौंड) या त्यांच्या दुकानात असताना त्यांच्या अंगावर पावसामुळे जुन्या बांधकामाची भिंत पडल्याने त्या जखमी झाल्या होत्या. यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला होता. प्रशासकीय पुर्ततेअंती आज त्यांच्या वारसांना ४ लक्ष रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. त्यांचे प्रमाणपत्र आमदार राहूल कुल यांच्या हस्ते देण्यात आले.
पोल्ट्री धारक शेतकऱ्याला मिळणार आर्थिक भरपाई – हातवळण (ता. दौंड) येथील अक्षय गोगावले, शुभम गोगावले यांच्या पोल्ट्री शेडमध्ये अवकाळी पावसाचे पाणी शिरल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. या घटनेची आमदार राहुल कुल यांनी दखल घेत आज तालुक्यातील सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी आमदार राहुल कुल यांच्याकडून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून गोगावले यांना लवकरात लवकर आर्थिक भरपाई मिळवून देण्याचे स्पष्ट आदेश यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.