केडगाव येथे तिरंगा पदयात्रा उत्साहात संपन्न

केडगाव (दौंड) : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यानंतर भारतीय संरक्षण दलांनी ऑपरेशन सिंदुर अंतर्गत जबरदस्त प्रहार करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. यामध्ये विषेशतः भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील अनेक शहरांवर अचुक क्षेपणास्र हल्ला करीत अतिरेकी तळ उध्वस्त करून आपले सामर्थ्य संपुर्ण जगाला दाखवून दिले.

या संपूर्ण कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. याच ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर भारतीय संरक्षण दलांच्या सन्मानार्थ दौंड तालुक्यातील केडगाव येथे तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि केडगाव पंचक्रोशीतील नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पदयात्रे दरम्यान ‘भारत माता की जय’, वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या.

या पदयात्रेनंतर केडगाव ग्रामपंचायत समोर सभा घेण्यात आली. यामध्ये आमदार राहुल कुल यांनी बोलताना, ऑपरेशन सिंदूर चा आपण भारतीय म्हणून आपणासर्वांना नक्कीच अभिमान असून, संरक्षण दलांनी दाखवलेले शौर्य व धाडस हे प्रत्येक भारतीयाच्या मनात गर्व निर्माण करणारे आहे. त्यामुळे अशा तिरंगा पदयात्रा कार्यक्रमांच्या माध्यमातून देशप्रेम अधिक घट्ट होते आणि नवीन पिढीला प्रेरणा मिळते असे आमदार कुल म्हणाले.

या पदयात्रेला भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ. कांचन कुल, दौंड तालुका पश्चिमचे मंडल अध्यक्ष राहुल हंडाळ, केडगाव व परीसारतील माजी सैनिक बांधव, तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.