Big News : आता घर खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी बिल्डरला भरावी लागणार, राज्य सरकारने घेतले आज अनेक महत्वाचे निर्णय



मुंबई : सहकारनामा 

घर खरेदी करण्याचे प्रत्येकजण स्वप्न पाहत असतो मात्र अनेकांना घर घेताना द्यावी लागणारी स्टॅम्प ड्युटी ही डोंगरा एवढी वाटत असते.

सर्वसामान्यांची हीच अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला असून आता घर खरेदी करताना ग्राहकांना स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार नाही तर ही स्टॅम्प ड्युटी आता बिल्डरांना भरावी लागणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

याच बरोबर बांधकामांवर प्रीमियम सवलती देण्याचा निर्णयही देखील आज घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

आज राज्य सरकारच्या  मंत्रिमंडळामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून यामध्ये बांधकामांवर प्रीमियम सवलत, बिल्डरांनी स्टॅम्प ड्युटी भरणे, राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार करण, केंद्र सरकारच्या ग्रामीण रस्ते विकास मंत्रालयासोबत सामंजस्य करारात सहभागी होणे, औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय येथे नव्याने १६५ खाटा आणि ३६० पदांच्या निर्मिती करण्यास  मान्यता देणे, शेतकऱ्यांना कृषी पंप वीज पंपासाठी सौर ऊर्जा उपलब्ध करणे, पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायाधीश (वरीष्ठ स्तर) ही दोन न्यायालये उभारणे, आणि महाराष्ट्रातील 31 डिसेंबर 2020 पर्यंतच्या गुंठेवारी योजना नियमित करणे तसेच गरीब व सर्वसामान्य लोकांच्या निवाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमात सुधारणा करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.