दौंड : दौंड तालुक्यातील दहिटणे येथून एका ११ महिन्याच्या मुलाला बिबट्याने उचलून घेऊन गेल्याची गंभीर घटना घडली आहे. दहिटणे येथील बापूजीबुवा वस्ती येथे ही घटना घडली असून भिसे कुटुंबीय बकऱ्यांच्या वाड्यावर असताना त्यांच्या अनवित धुळा भिसे (वय ११ महिने) या अकरा महिने वयाच्या मुलाला बिबट्याने उचलून नेले होते मात्र अजूनही त्या चिमुकल्याचा शोध लागलेला नाही.
मिळत असलेल्या माहितीनुसार बिबट्याने सकाळच्या वेळी त्या मुलाला आईच्या समोरुन ओढून नेले. बिबट्याने मुलाला ओढून घेऊन जात असताना त्या मुलाच्या आईने आरडाओरडा केला मात्र तो पर्यंत बिबट्याने पलायन केले होते. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दौंड तालुक्यातील नदी किनारी असणाऱ्या गावांमध्ये वेळोवेळी बिबट्याचे दर्शन होत असते. या बिबट्यांकडून पाळीव प्राणी, भटकी कुत्री आणि कधी कधी महिला किंवा पुरुषांवरही हल्ले केलेले आहेत.
सध्या वन विभाग आणि यवत पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने परिसरामध्ये बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र सायंकाळी ५ वाजेपर्यंत तरी या चिमुकल्याचा कसलाच थांगपत्ता लागलेला नाही. वनविभाग स्थानिक अश्या दोन्ही पोलिसांच्या पथकांकडून डॉगस्कॉड माध्यमातून त्या चिमुकल्या मुलाचा शोध घेतला जात आहे.