पुणे : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वरील हडपसर ते यवत दरम्यान वाहतूक कोंडी, नागरिक त्रास आणि रस्ता रुंदीकरणासाठी जागेची अडचण लक्षात घेता सहापदरी उन्नत मार्ग (उड्डाणपूल) उभारणी व रस्ता रुंदीकरणासाठी सुमारे ५२६२.३६ कोटी रुपयांचा प्रकल्प राज्य सरकारने मंजूर केला आहे.
या प्रकल्पासाठी दौंडचे आमदार राहुल कूल यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केली असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, या प्रकल्पासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या प्रकल्पाची सखोल दखल घेतली आणि सविस्तर डीपीआर तयार करण्याचा सूचना दिल्या होत्या ज्यामुळे प्रकल्पाची अंमलबजावणी आज शक्य झाली आहे.
आमदार राहुल कूल म्हणाले, “हडपसर ते यवत या महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मी सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे मागणी केली. आज या प्रयत्नांना यश मिळाले असून, या प्रकल्पामुळे पूर्व पुणे, हवेली व दौंड तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल, वाहतूक सुरळीत होईल आणि भागाचा सर्वांगीण विकास होईल. या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि नितीन गडकरी यांचे मनःपूर्वक आभार मानतो असेही आ.कुल म्हणाले.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर वाहतूक सुरळीत होऊन अपघात कमी होतील आणि स्थानिक विकासाला मोठा चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.