विवाहित महिलेचा विनयभंग करून महिला व पतीला जबर मारहाण, दौंड शहरात अवैध धंदे करणाऱ्यांची मुजोरी वाढली

अख्तर काझी

दौंड : विवाहित महिलेचा विनयभंग करून तिला व तिच्या पतीला घरात घुसून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना दौंड शहरात घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून दौंड पोलिसांनी अमन अनिल जाधव (रा. गोवागल्ली, दौंड) विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74, 76, 296, 115(2), 351(3), 352 प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 19 एप्रिल रोजी रात्री 1 वाजताच्या दरम्यान घडली. फिर्यादी आपल्या घरासमोरील ओट्यावर बसल्या होत्या. गल्लीत राहणारा आरोपी अमन जाधव दारूचे नशेत तेथे आला व त्याने फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांच्या अंगावरील कपडे फाडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, तसेच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

एवढ्यावरच न थांबता आरोपी फिर्यादी यांच्या घरात घुसला व घरात झोपलेल्या फिर्यादी यांच्या पतीला सुद्धा त्याने मारहाण केली. शेजारी राहणाऱ्या नातलगांनी आरोपीला धरून बाजूला नेले त्यानंतर तो तेथून निघून गेला. आरोपी गोवा गल्ली परिसरात अवैध धंदे करतो, या धंद्यातून त्याला भरपूर पैसे मिळत आहेत आणि अवैध मार्गाने मिळविलेल्या या पैशाच्या जोरावर तो परिसरात हाणामारी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो अशी माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे. अवैध धंद्याच्या पैशाच्या जोरावर मुजोरी करणाऱ्या भाईंचा पोलीस प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.