भंडारा : सहकारनामा
भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये एक भीषण घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्य हादरले आहे.
भंडारातील जिल्हा अतिदक्षता नवजात शिशु केअर युनीट (एस एन सी यु) मध्ये अचानक आग लागल्याने 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा प्रकार घडला आहे. ही आग शॉर्ट सर्किटने मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास लागल्याची माहिती पुढे येत आहे.
रुग्णालयाला आग लागल्याची माहिती मिळताच आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल नागपूर येथून भंडारा रुग्णालयात पहाटे 5:35 वाजता दाखल होऊन त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. पोलिसांनी या रुग्णालयाच्या चारही बाजूने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
आग लागल्यानंतर आत झालेल्या धुरामुळे या बालकांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती आता पुढे येतआहे.
ही घटना घडण्या अगोदर शनिवारी रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बाॅर्न युनिट मधून धूर निघत असल्याचे दिसले त्यावेळी ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. याबाबत त्यांनी त्वरित दवाखान्यातील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
या शिशु केअर सेंटरमध्ये आउटबॉर्न आणि इन बाॅर्न असे 2 भाग आहेत. यातील इनबोर्न मॉनिटर मध्ये असलेले 7 बालक वाचविण्यात यश आले मात्र आऊट बाॅर्न युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला.
हि घटना समजताच जिल्हा रुग्णालयात जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रमोद खंडाते यांनी घटनास्थळी धाव घेतली.