अख्तर काझी
दौंड : क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने दौंड चे सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर प्रेम कुमार भट्टड यांना राज्यस्तरीय पॅंथर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दौंड येथील न्यू महाराष्ट्र पॅंथर सेना महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने त्यांना हा पुरस्कार माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया व सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप बगाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष स्वप्निल शहा, डॉ. मीना भट्टड, डॉ. चिराग भट्टड, डॉ. मैत्रयी भट्टड तसेच सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. प्रेमकुमार भट्टड यांनी अनेक वर्षापासून नेत्रदान चळवळ सुरू ठेवली आहे.
डॉक्टरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी नेत्रदान करून दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला आहे. डॉक्टरांनी गावोगावी जाऊन डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी शिबिरांचे आयोजन केले. आपणही या समाजाचे देणे लागतो या उद्देशाने डॉक्टर फक्त स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय न पाहता आषाढी वारीतील भक्तांची मनोभावे सेवा करतात.
डॉक्टरांची वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरी व सामाजिक कामांची दखल घेत विविध संघटनांकडून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. डॉक्टरांचे संपूर्ण कुटुंब त्यांना त्यांच्या सामाजिक कामात मोलाची साथ देत आहेत.