ज्यांना चोरटे म्हणून पकडले ते निघाले खरोखरचे पोलीस, दौंड मधील प्रकार

अख्तर काझी

दौंड : दौंड-गोपाळवाडी रोडवरील सरपंच वस्ती परिसरात तीन अनोळखी व्यक्ती पोलीस असल्याचे सांगून परिसरातील दुकान व बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करीत होते. या तिन्ही व्यक्ती पोलीस गणवेशात नसल्याने तसेच ओळखीचे पोलीस नसल्याने हे खरेच पोलीस आहेत की आपल्या परिसराची व दुकानांची रेकी करायला आलेले चोरटे आहेत अशी भीती येथील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि दोन दिवस पाळत ठेऊन चोरटे म्हणन ज्यांना पकडले ते खरोखरचे पोलीस निघाल्याने नागरिकांचा जीव मात्र भांड्यात पडला.

त्याचं झालं असं कि, अनोळखी तिघेजण दौंडच्या वस्तीवरील दुकानांमध्ये, बंगल्यांमध्ये जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत असल्याचे नागरिकांना दिसले. ही बाब व्यापारी आणि नागरिकांनी दौंड चे पोलीस कर्मचारी रोटे यांना सांगितली. तेव्हा रोटे यांनी आमचे कोणतेच पोलीस आम्ही त्या ठिकाणी पाठविलेले नाहीत असे सांगताच या परिसरातील नागरिकांची व व्यापाऱ्यांची तर झोपच उडाली. त्यांना वाटले की हे तिघे खरेच चोरटेच आहेत आणि ते आपल्या परिसराची रेकी करण्यासाठीच येत आहेत, काहीतरी धोका दिसतो आहे. संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने येथील व्यापाऱ्यांनी संपूर्ण रात्र जागूनच काढली. व दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी थेट पोलीस स्टेशनला धाव घेत पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची भेट घेतली व परिसरात घडत असलेला प्रकार सांगितला.

पवार साहेबांनी पोलीस पथकाला या घटनेचा तपास करण्याच्या व त्या तिघांना शोधण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे पोलीस पथकाने सरपंच वस्ती परिसरात तिघांचा शोध घेतला, परिसरात रात्रीची गस्त पोलिसांनी वाढविली परंतु काहीच हाती लागले नाही. दि. 2 एप्रिल रोजी हे तिघे संशयित पुन्हा सरपंच वस्ती परिसरात आलेले एका महिलेने पाहिले, तिने हे व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. व्यापाऱ्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला याची खबर दिली. खबर मिळताच दौंड पोलिसांच्या पथकाने वेगातच सरपंच वस्ती गाठली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून त्या तिघांचा परिसरात शोध घेतला असता ते मिळाले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता ते खरेखुरे पोलीसच निघाले. बाहेर गावातील हे पोलीस पथक एका गुन्ह्याच्या तपासासाठी या परिसरात येत होते व म्हणूनच ते येथील दुकानातील, बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करीत होते असे त्यांनी सांगितले. दौंड पोलिसांनी त्यांच्या ओळखपत्रांची पाहणी करून खात्री केली असता ते पोलीसच असून तपास कामी येथे आल्याचे निष्पन्न झाले. हा सर्व प्रकार सरपंच वस्ती परिसरातील नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या समोर झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

येथील व्यापारी व नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार बापू रोटे, विठ्ठल गायकवाड व दौंड पोलिसांच्या शोध पथकाने दाखविलेल्या तत्परतेबाबत सरपंच वस्ती व्यापारी संघटना, नागरिकांच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे. सदर घटनेची ठाणे दैनंदिनी तपशील मध्ये नोंद करण्यात आली आहे.