अख्तर काझी
दौंड : किराणा मालाचे सामान आणण्याकरिता आलेल्या मुलीचा दोघांनी विनयभंग केल्याची घटना येथील पानसरे वस्ती परिसरात घडली. शहरात विनयभंगाच्या घटनांचे सत्र सुरूच असून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी सुरज यशवंत वेलणकर व संतोष बाडकर (दोघे राहणार पानसरे वस्ती, दौंड) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74, 351(2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 2 एप्रिल रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान येथील पानसरे वस्ती येथे घडली. पीडिता किराणा मालाचे सामान आणण्याकरिता घराबाहेर आली होती. सामान घेऊन ती घरी परत जात असताना, परिसरात राहणारे सुरज व संतोष या दोघांनी तिच्याकडे पाहून काहीतरी शेरेबाजी केली. शिरेबाजी ऐकून मुलीने त्यांच्याकडे रागाने बघितले. त्यामुळे संतोष याने मुलीच्या अंगावरील ओढणी ओढली, मुलीने प्रतिकार केला असता सुरजने तिचे केस ओढून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
एवढ्यावरच न थांबता दोघांनी मुलीला शिवीगाळ करीत घडलेला प्रकार कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईस सांगितला. दोघेही आरोपी फरार आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार अमीर शेख करीत आहेत.
महिनाभरात शहरातील मुलींच्या विनयभंगाच्या 3-4 घटना घडलेल्या आहेत. यातील काही मुली तर अल्पवयीन आहेत. या गुन्ह्यातील आरोपींना दौंड पोलिसांनी अटक करून जेलची हवा सुद्धा दाखविली आहे. तरीसुद्धा मुलींच्या छेडछाडीच्या घटना सातत्याने घडतच असल्याने पालक वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेची सत्यता पाहून, पोलिसांची धास्ती नसलेल्या अशा रोड रोमियोंची शहरातून धिंड काढून त्यांचा माज पोलिसांनी उतरविला पाहिजे अशी मागणी पालकांकडून होत आहे.