Political : कार्यकर्ते गाव पुढाऱ्यांच्या दोन हात पुढे, गाव पुढाऱ्यांवर नामुष्कीची वेळ



दौंड : सहकारनामा विशेष

नेहमीच कार्यकर्त्यांना गृहीत धरणाऱ्या गाव पुढाऱ्यांना सध्या कार्यकर्तेही धक्क्यावर धक्के देत असून गाव पुढारी आपली भूमिका बदलून पाहिजे तो पर्याय (मग तो पर्यायी कार्यकर्त्यांचा का असेना)  निवडतात आणि कार्यकर्ते मात्र मनात नसतानाही मन मारून निमूटपणे त्यांचे काम करतात किंवा सिस्टीम मधून बाहेर तरी पडतात ही आत्तापर्यंतची राजकीय परंपरा होती. 

मात्र सध्याचा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी गाव पुढाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा चंग बांधला आहे. आत्तापर्यंत गाव पुढारी एखादा कार्यकर्ता त्यांना अडचणीचा वाटू लागला, पुढे जाऊ लागला की त्याला पर्याय शोधून त्यास चेक देण्याचे काम करायचे. आता मात्र गाव पातळीवर काम करणारा कार्यकर्ता या गाव पुढाऱ्यांच्या दोन हात पुढे जाऊन त्यांचाच विरोधक असणारा दुसरा गाव पुढारी हाताशी धरत हे कार्यकर्ते आता जुन्या गाव पुढाऱ्याला चेक देऊन मोकळे होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे मात्र गाव पुढाऱ्यांची पाचावर धारण बसत असून त्यांच्या कुरखोड्यांना आता आळा बसू लागला आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला पर्याय शोधत असाल तर तुमचे पर्याय आमच्यापुढे खुले असल्याचे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. 

आणि हाच उपाय आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी ब्रम्हास्त्र ठरत असून कार्यकर्त्यांना गृहीत धरून त्यांच्याकडून पाहिजे तसे काम करून घेण्याचे, ऐनवेळी या कार्यकर्त्यांना मनासारखे वळविण्याचे प्रयत्न आता कालवश झाल्याचे पाहायला मिळत आहेत.