दौंड पोलीस स्टेशन समोरून भर दिवसा दुचाकी चोरीला! दुचाकीच्या डिकीमध्ये 87 हजार रुपये, CCTV मध्ये चोरटे कैद.. चोरट्यांना पकडण्याचे दौंड पोलिसांसमोर आव्हान



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

दौंड पोलीस स्टेशन समोरील येवले चहा हॉटेल समोर लावलेली दुचाकी चार जणांच्या टोळक्याने भरदिवसा चोरून नेल्याची घटना घडली आहे. चोरीला गेलेल्या दुचाकीच्या डिकीमध्ये 87 हजाराची रोकड असल्याने घटना आणखीनच गंभीर झाली आहे. 

पोलीस स्टेशन च्या अगदी समोरून चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दौंड पोलिसांना जणू आव्हान देण्या सारख्याच घटना शहरात दिवसागणिक घडु लागत असल्याने पोलिसांनी सुद्धा आता अशा घटना गांभीर्याने घेण्याची गरज झाली आहे अशा प्रतिक्रिया सुद्धा व्यापारी वर्गातून उमटत आहेत.

धनंजय नारायण साळुंखे(वय 42,रा. मळद, दौंड) यांनी याप्रकरणी फिर्याद नोंदविली असून दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी यांनी आपल्या मालकीची दुचाकी(TVS जुपिटर,MH 42-AY 2882) आपले भाचे अक्षय वाघमारे(रा. कुंभार गल्ली, दौंड) यांना वापरावयास दिली होती.दि.13जाने. रोजी सकाळी 10 च्या सुमारास फिर्यादीचा मावस भाऊ हा अक्षय याच्या घरून ही दुचाकी घेऊन येवले चहा हॉटेल समोरील आपल्या केश कर्तनालयाच्या दुकानात आला, त्यावेळी त्याने दुचाकी हॉटेल समोर हँडल लॉक करून उभी केली दरम्यान दुकानातील साहित्याच्या खरेदीसाठी असलेले आपल्याकडील 87 हजार रुपये त्याने दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवले व दुकानात आला.

दुकानातील कामकाज आवरून दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान तो गाडी लावलेल्या ठिकाणी आला असता त्या ठिकाणी त्याला दुचाकी आढळून आली नाही. फिर्यादी व नातलगांनी परिसरात व शहरात सदर दुचाकीचा शोध घेतला मात्र दुचाकी मिळाली नाही त्यामुळे दुचाकी चोरीला गेली आहे हे लक्षात येताच फिर्यादी व त्याच्या मित्रांनी दौंड पोलिसांना दुचाकी चोरीच्या घटनेची माहिती दिली, त्यावेळी पोलीस स्टेशनला हजर असलेले पोलीस कर्मचारी रोटे यांनी लागलीच पोलीस स्टेशन परिसरात लावलेल्या CCTV चे फुटेज तपासले असता चार जणांच्या टोळक्याने दुचाकी चोरून नेल्याचे दिसले आहे.

ज्या  ठिकाणाहून दुचाकी चोरीला गेली तेथील हॉटेल कल्पलता मधील CCTV फुटेज मध्ये सुद्धा हे चोरटे कैद झाले आहेत.CCTV फुटेज च्या आधारे पोलिसांना जर हे  चोरटे पकडण्या मध्ये यश आले तर शहरातील अनेक दुचाकी चोरी घटनांचा उलगडा होवू शकेल असे बोलले जात आहे.