‘कुल’ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून एका रात्रीत  ‘कळसुबाई शिखर’ सर

पुणे : केडगाव (ता.दौंड) येथील ‘सुभाष बाबुराव कुल’ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एका रात्रीमध्ये कळसुबाई शिखर सर केले आहे. पर्यावरण शिक्षण, पर्यटन भूगोल व क्रीडा या विभागाद्वारे दोन दिवसीय भंडारदरा सांदण व्हॅली कळसुबाई शिखर अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण सहलीचे नियोजन भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर अशोक दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव जागृती निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांमधील स्वतःच्या शारीरिक व बौद्धिक क्षमतांची जाणीव निर्माण करणे हे या सहलीचे प्रमुख उद्दिष्ट होते अशी माहिती डॉ.अशोक दिवेकर यांनी दिली. या अभ्यास सहलीत 41 विध्यार्थिनी, 24 विद्यार्थी व सात प्राध्यापक सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी सांदण व्हॅली ही आशियातील दुसऱ्या क्रमांकाची दरी विद्यार्थ्यांनी पाहून या दरीचा भौगोलिक अभ्यास जाणून घेतला. यावेळी सहलीत सहभागी झालेल्या महाविद्यालयातील या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सांदण व्हॅली मध्ये 200 फूट उंचीवरून रॅपलिंग केले.

या नंतर दुसऱ्या दिवशी रात्री साडेतीन वाजता कळसुबाई शिखर चढण्यास विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. या सहलीत विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती त्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापिका व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले व रात्री साडेतीन वाजता कळसुबाई शिखर सर करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अवघड वाटणारी चढण विद्यार्थिनींमध्ये नकारात्मक भूमिका निर्माण करत होत्या परंतु सर्व प्राध्यापक आपापल्या गटातील विद्यार्थ्यांना प्रबोधन करून मार्गदर्शन करत होते व आपण सगळ्यांना शिखरावर पोहोचायचे आहे जायचे आहे यासाठी प्रेरणा देत होते. प्रत्येक प्राध्यापकांकडे 10 विद्यार्थ्यांचा गट होता पौर्णिमेच्या चंद्राच्या उजेडात व टॉर्च च्या साह्याने रात्री सर्व विद्यार्थी एकामागून एक शिखर सर करत गेले व अवघड वाटणारे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर विद्यार्थ्यांनी सकाळी सहा वाजता सर केले.

शिखरावर गेल्यानंतर एक वेगळाच आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. शिखरावरून विद्यार्थ्यांनी सूर्योदयाचे विलोभनीय दृश्य अनुभवले व सगळ्यांचा थकवा दूर झाला.  प्रा. डॉ विशाल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना फिजिकल फिटनेस विषयी मार्गदर्शन केले तर प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव यांनी कळसुबाई देवीचा इतिहास विद्यार्थ्यांना समजून सांगितला. सहप्रमुख प्रा. डॉ.अशोक दिवेकर व प्रा. आकाश कुसमाडे यांनी विद्यार्थ्यांना कळसुबाई परिसराची भौगोलिक व पर्यावरणीय माहिती दिली.

कळसुबाई देवीचे दर्शन घेऊन साडेसात वाजता विद्यार्थ्यांनी हे शिखर खाली उतरायला सुरुवात केली. साडेनऊ वाजता विद्यार्थी कळसुबाईच्या पायथ्याशी उतरले. या सहली च्या आयोजनासाठी प्राचार्य. डॉ. नंदकुमार जाधव, क्रीडा विभाग प्रमुख डॉ विशाल गायकवाड, प्रा. आकाश कुसमाडे, प्रा. संपदा सावंत, प्रा. धनश्री खळदकर, प्रा. माया होळकर, श्री निलेश टेकवडे व डॉ.अशोक दिवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या विशेष सहलीचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे सचिव धनजी शेळके, अध्यक्ष चंद्रकांत पाटील शेळके व पालक यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले.