CRIME NEWS | कोळसा वाहतूक करणाऱ्या पारधी कुटुंबावर जेजुरी येथे गोरक्षक टोळक्याकडून तलवारीने वार

पुणे : (अब्बास शेख)  कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून कोळसा वाहतूक व्यवसाय करणाऱ्या वाहनातील पारधी कुटुंबावर जेजुरी चौकामध्ये गोरक्षक म्हणवणाऱ्या पाच जणांच्या टोळक्याकडून लोखंडी रॉड आणि तलवारीने वार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. याबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात पाच आरोपिंवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद शांताराम काळे (रा.अंजनगाव ता.बारामती) हे आपल्या पत्नीसह वाहनातून कोळसा घेऊन जेजुरी बाजुस जात असताना रात्रीच्या 2 वाजता मावडी क.प येथे दोन मोटार सायकल वरील पाच अनोळखी इसमांनी त्यांचा टेम्पो थांबवून आम्ही गोरक्षक आहे, तुझ्या गाडीत तू जनावरे चालविली आहे का असे म्हणत गाडीची झडती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादी यांनी, माझ्या गाडीत कोळसा आहे. आम्ही पारधी समाजाचे असुन कोळसा तयार करून पुणे येथे विकतो, असे म्हणाले.

त्यावेळी या पाच जणांनी फिर्यादी यांना गाडीतून खाली उतरून गाडीत काय आहे ते दाखव असे म्हणाले त्यामुळे फिर्यादीने त्यांना गाडीतील कोळासा दाखविला आणि फिर्यादीने गाडी चालु करून जेजुरी बाजुकडे निघाले. मात्र फिर्यादीची गाडी पुणे बाजुकडे जात असताना या आरोपिंनी स्वतःकडे असणाऱ्या दुचाकीवरून फिर्यादी यांच्या गाडीचा पाठलाग सुरु केला. त्यामुळे आपल्या सोबत आपली पत्नी आहे आणि रात्रीची वेळ आहे त्यामुळे फिर्यादीने गाडी न थांबवता जेजुरी चौकात आले.

त्यावेळी वरील आरोपिंनी जेजुरी एस.टी.स्टॅण्ड च्या चौकात या गाडीला स्वतःची दुचाकी आडवी लावून शाईन गाडीवरील तिघांनी दगड उचलून टेम्पोवर मारण्यास सुरवात केली. त्यामुळे फिर्यादी टेम्पोतुन खाली उतरले असता या आरोपिंनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करत तू पारधी आहे, भंगारडया तुला गाडी थांबव म्हणालो तर तू गाडी का थांबवली नाही, तू बेकायदेशीर कोळसा वाहतोस असे म्हणून फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार पाहून फिर्यादीची पत्नी टेम्पोतून उतरून पतीला या आरोपिंच्या मारहाणीतून सोडवू लागली, हे पाहून दुसऱ्या दुचाकीवरील दोन इसमांनी ज्यांच्याकडे लोखंडी रॉड आणि तलवार होती त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात रॉड मारला आणि दुसऱ्याने फिर्यादीच्या पायावर तलवारीने वार करण्यास सुरुवात केली.

नागरिकांच्या प्रसांगवधानाने वाचले प्राण – हा सर्व प्रकार होत असताना जेजुरी चौकातील चहा टपरीवर असणाऱ्या काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मारहाण करणारे आरोपी तेथून पसार झाले. या सर्व प्रकाराबाबत फिर्यादी यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार जेजुरी पोलिसांनी आरोपी 1) नवनाथ भागुजी महानवर 2) अनिकेत किरण वाडेकर 3) दिग्विजय रवींद्र गायकवाड 4) शुभम सतोष चव्हाण (चौघे ही राहणार मावडी क.प, ता. पुरंदर, जि. पुणे व 5) रोहित नितीन यादव (रा. हर्णीं ता पुरंदर, जि. पुणे) या आरोपिंवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाकचौरे यांनी दिली. घटनेचा अधिक तपास उपविभागिय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड, तानाजी बरडे हे करीत आहेत.