भाजप 32, राष्ट्रवादी 30, तर शिवसेनचाही 30 जागेंबाबत मोठा गौप्यस्फोट! मग दौंड तालुक्यातील ग्रामपंचायतींची खरी आकडेवारी किती? जाणून घ्या…



सहकारनामा विशेष : (अब्बास शेख)

दौंड तालुक्यामध्ये 51 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आणि त्या दिवसापासूनच मोठ्या उलथापालथीला सुरुवात झाली. दोन्ही पक्षातील (गटांतील) कार्यकर्त्यांचे विरोधी पक्ष प्रवेश हा चर्चेचा विषय बनला होता. मात्र या निवडणुकीत खरी रंगत हि तालुक्यातील दिग्गज व्यक्ती निवडणुकीला उभ्या राहिल्यानंतर आली. 

मतदान झाले अण 18 जानेवारी हा निकालाचा दिवस उजाडला मात्र या दिवशी जवळपास दोन्ही गटांतील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. यात कुल गटांतील अनेक दिग्गजांचे पराभव हा चर्चेचा विषय ठरला आणि थोरात गटाने एकच जल्लोष करत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतींमध्ये थोरात गटाची (राष्ट्रवादीची) सत्ता आल्याचा संदेश सर्वत्र पसरला. मात्र थोड्याच वेळात सर्व निकाल बाहेर आले आणि भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव उर्फ माऊली ताकवणे यांनी भाजप 32, राष्ट्रवादी 17 आणि संमिश्र 02 अशी  ग्रामपंचायतींची आकडेवारी जाहीर केली आणि तशी यादी सोशल मीडियावर व्हायरल करत एकच खळबळ उडवून दिली. 

भाजप ने हि आकडेवारी जाहीर करताना 51 ग्रामपंचायतींची नावे, त्यांचे एकूण झालेले मतदान आणि भाजप व राष्ट्रवादीकडे आलेल्या ग्रामपंचायतींची उल्लेख करत राष्ट्रवादीच्या जल्लोषाची हवा काढून घेतली. तर भाजपने केलेल्या दाव्याची बातमी लागताच राष्ट्रवादीने या आकडेवारीवर आक्षेप घेत हि आकडेवारी खोटी असून आमची 51 पैकी 30 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता आल्याचे जाहीर केले. 

मात्र त्यांच्याकडून अजून त्या 30 ग्रामपंचायतींची यादी जाहीर करण्यात आली  नसली तरी ते आपल्या दाव्यावर ठाम आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या दाव्यांमुळे दौंड तालुक्यातील जनता आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अगोदरच गोंधळलेले असताना शिवसेनेनेही आपले 30 उमेदवार या निवडणुकीत जिंकून आले असून त्यांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचा गौप्यस्फोट केल्याने अगोदरच गोंधळलेले कार्यकर्ते अजून बुचकाळ्यात पडले आहेत. 

सध्या दौंड तालुक्यात कोणत्या पक्षाच्या किती ग्रामपंचायती आल्या आहेत याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. 

भाजपने आपली यादी जाहीर करून 32 ग्रामपंचायतींवर आपला हक्क सांगितला आहे, तर राष्ट्रवादीने यादी जाहीर न करता 30 ग्रामपंचायतींवर आपला झेंडा असल्याचे जाहीर केले आहे आणि आता या दोन्ही गटांमध्ये शिवसेनेचे महेश पासलकर यांनी आमचे 30 उमेदवार निवडून आल्याचा गौप्यस्फोट केल्याने तालुक्यातील जनता पुरती संभ्रमात पडली आहे. 

मात्र हे ट्विस्ट लवकरच संपुष्टात येणार आहे कारण लवकरच सरपंचपदाचे आरक्षण निघणार असून या नंतर नेमके कोणत्या गटाचे किती सरपंच म्हणजे पर्यायानेच कुणाच्या किती ग्रामपंचायती हे जाहीर होईल आणि तालुक्यातील जनतेच्या समोरही खरी आकडेवारी निश्चित येईल यात शंका नाही.