ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर इनाम देवस्थान जमिनीचा वाद पुन्हा एकदा उफाळला

दौंड : गावकरी, समाज बांधव आणि इनाम देवस्थान जमिनींचा वाद अनेक ठिकाणी विविध कारणांमुळे उफाळून येत असल्याचे दिसते. काही सार्वजनिक देवस्थान प्रकरणांमध्ये दिवा बत्तीसाठी नेमलेले पुजारी स्वतःच मालक असल्यासारखे वागून ग्रामस्थांना किंवा त्या संबंधित समाजातील लोकांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने स्वतःची वयक्तिक ट्रस्ट बनवून आपणच या देवस्थानाचे सर्वेसर्वा असल्याचे भासवून मनाला वाट्टेल तश्या पद्धतीने देवस्थान जमिनींचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात आणि मग त्यातूनच ग्रामस्थ विरुद्ध पुजारी असा वादाचा भडका उडून गावातील देवस्थानाचा वाद कोर्टकचेरीपर्यंत पोहोचत असल्याचे पहायला मिळत आहे.

असाच एक वाद आता दौंड तालुक्यातील बोरिपार्धी, धायगुडेवाडी येथील बोरमलनाथ देवस्थान इनाम जमीन मधील बेकायदेशीर बांधकामे व गाळयांबाबत सुरु झाला असून याबाबत तालुका न्यायदंडाधिकारी यांच्या समोर राजेंद्र महादेव भगवान आणि इतर १० तक्रारदारांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात येत्या ४ मार्च रोजी समबंधित व्यक्तींना कागदोपत्री पुरावे सादर करून आपले लेखी म्हणणे मांडायचे आहे. या दिवशी जर या व्यक्ती उपस्थित राहून त्यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात सादर केले नाही तर मात्र त्यांना या कृती बाबत जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत सोशल मीडियावर संबंधित व्यक्तींनी नोटीस टाकल्याने याची माहिती इतरांना झाली आहे.

बोरिपार्धी, धायगुडेवाडी हद्दीत असणाऱ्या बोरमलनाथ इनाम देवस्थान जमिनीतील अनधिकृत बांधकाम आणि गाळे यांच्याबाबत राजेंद्र महादेव भगवान व इतर १० ग्रामस्थांनी दिनांक १४/०२/२०२५ रोजी तक्रारी अर्ज करुन बोरमलनाथ देवस्थान इनाम जमीन मधील बेकायदेशीर बांधकामे व गाळयांबाबत तक्रार केली आहे. त्यामध्ये त्यांनी नमुद केले आहे की, मौजे धायगुडेवाडी, बोरीपार्थी ता. दौंड, जि. पुणे येथील श्री. क्षेत्र बोरमलनाथ देवस्थान इनाम जमीन गट नं. १४४ ही शेती शासनाने देवस्थानला दिवा बत्ती, देखभाल दुरुस्ती करुन खाण्यासाठी (कृषिक) दिलीआहे.

परंतु बोरमलनाथ देवस्थान पुजारी यांनी कोणतीही शासकीय पुर्व परवानगी न घेता ग्रामस्थांचा विरोध असताना सदर जमिनीमध्ये अनधिकृतरित्या चौफुला-केडगांव रोड लगत बांधकाम करुन गाळे भाडे पट्ट्यावर दिले आहेत व अकृषिक म्हणुन सदर जागेचा वापर करीत आहेत. भविष्यात सदरचे गाळेधारक ती जागा बळकावण्याची दाट शक्यता आहे. तसेच सदर येणा-या पैशाचा कसलाच हिशोब दिला जात नाही किंवा शासनाला कोणत्याही स्वरुपाचा कर भरला जात नाही असे तक्रादारांचे म्हणणे आहे.

यापूर्वीही वरील कार्यालयाकडून जमीन/कावि/ ७३९/२००७, दिनांक २१/०७/२००७ अन्वये देवस्थान इनाम जमीन कसणाऱ्यांना नोटीस देवून, ज्या जमिनीत ते बांधकाम करीत आहेत त्याच्या मालकी हक्काबाबतचा पुरावा, बांधकामासाठी स्थानिक स्वराज्य संस्था वा इतर सक्षम अधिका-यांची परवानगी घेतली असल्यास त्या संबंधिचे दस्त ऐवज / परवानगी, बांधकाम करण्यासाठी बिनशेती परवानगी घेतली आहे का? असल्यास महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४४ वा इतर कायद्यानुसार सक्षम अधिका-याकडील परवानगी आदेश वा इतर कागदपत्रे सादर करावीत असे त्यांना कळविले होते.

तथापी त्याबाबतचे कोणतेही कागदपत्रे त्यांनी तहसील कार्यालयास सादर केले नाहीत. तसेच या कार्यालयाकडून दिलेल्या नोटीसाचा भंग करुन अकृषिक बिन शेतीपरवानगी न घेता अनाधिकृतपणे देवस्थान इनामच्या जागेमध्ये बांधकाम करीत असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदरची बांधकामे तात्काळ थांबवावीत व अर्जातील तक्रारीचे अनुषंगाने आपलेकडील पुराव्याचे कागदपत्रांसह दि. ४ मार्च रोजी लेखी म्हणणे सादर करावे असे त्यांना नोटिशीद्वारे बजावण्यात आले आहे. जर गैर अर्जदार यांनी सदर दिवशी उपस्थित न राहिल्यास व लेखी म्हणणे सादर न केल्यास विना परवानगी उक्त कायद्याचा भंग करुन अनाधिकृतपणे बांधकाम केल्याचे गृहीत धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.