Daund Pune Railway : दौंड – पुणे लोहमार्गावर अनारक्षित पॅसेंजर/शटल रेल्वे तातडीने सुरु करावी



दौंड : सहकारनामा

गेले १० महिने दौंड- पुणे लोहमार्गावर अनारक्षित पॅसेंजर /शटल रेल्वे सेवा बंद असल्याने अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे, कामानिमित्त दौंड – पुणे हा दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अत्यंत हाल होत असून सध्या केवळ आरक्षित प्रवाशांनाच रेल्वे प्रवासाची परवानगी दिली जात आहे. त्यामुळे

दौंड – पुणे लोहमार्गावर अनारक्षित पॅसेंजर/शटल रेल्वे तातडीने सुरु करावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे केली आहे. 

आ.कुल यांनी आपल्या पत्रामध्ये याबाबात सविस्तर माहिती देताना अत्यावश्यक सेवा, शासकीय, निमशासकीय सेवा तसेच कामानिमित्त दौंड – पुणे हा दैनंदिन रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी दौंड- पुणे लोहमार्गावर अनारक्षित पॅसेंजर /शटल रेल्वे सुरु करणे बाबत सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन यांनी पत्राद्वारे दौंड-पुणे अनारक्षित पॅसेंजर /शटल रेल्वे सेवा सुरु करण्याबाबत अनुकूलता दर्शविलेली आहे व तद्नुसार स्थानिक प्रशासनाद्वारे मदतीने आवश्यक सेवांसाठी दैनंदिन प्रवास करणारे नागरिक साक्षांकित करून देण्यासाठी यंत्रणा उभी करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

तसेच यासंदर्भांत स्थानिक प्रशासनाद्वारे पुणे विभागातील उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या धर्तीवर अत्यावश्यक सेवा प्रमाणपत्र /QR कोड असलेल्या प्रवाशांना रेल्वे द्वारे अनारक्षित तिकीट किंवा मासिक पास वितरित केला जावा, मा. सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन व मुख्य वाणिज्य व्यवस्थापक मध्य रेल्वे कार्यालय यांचे पत्रानुसार दौंड- पुणे लोहमार्गावर राज्य व केंद्र शासनाने घालून दिलेले कोवीड -१९ चे व सोशल डिस्टंसीग चे पालन करत अनारक्षित पॅसेंजर /शटल रेल्वे सेवा सुरु करणे कामी संबंधितांना कार्यवाहीचे आदेश देण्यात यावेत अशीही मागणी आ.राहुल कुल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

 याप्रश्नी माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी आपण अनेकवेळा व सातत्याने पाठपुरावा करत आहोत, हजारो चाकरमाण्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता प्रशासन आपल्या मागणीची दखल घेऊन तातडीने सकारात्मक कार्यवाही करेल हि अपेक्षा करतो असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.