दौंड : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विकास कामांना अडथळा ठरणाऱ्या 30 ते 40 वर्ष जुन्या पिंपळ व उंबर या वृक्षांचे पालकत्व स्वीकारण्याचा धाडसी निर्णय पर्यावरणप्रेमींनी घेतला व त्या निर्णयाला यशस्वी करण्याचे मोठे आवाहन या सर्व पर्यावरणप्रेमींनी पुढे होत हाती घेतले. जाणकारांच्या मते अशी घटना दौंड शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच घडते आहे.
तोडल्या जाणाऱ्या वृक्षांना जीवदान देणे म्हणजे दौंडच्या इतिहासाचा एक भागच जतन केला जाणार होता. झाडावरील पक्षांची घरटी व त्यातील लहान पिल्ले देखील सुरक्षितपणे पुनर्वशीत करणे या सर्व गोष्टी लक्षात घेत माजी क्रीडा शिक्षक माधव बागल व पर्यावरणप्रेमी प्रल्हाद जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रोहित राजेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून ही मोहीम आखली गेली.
दि.१२ व १३ फेब्रुवारीला सदर टीमने अत्यंत कमी वेळेत प्रभावीपणे ही मोहीम सलग दोन दिवस सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने पिंपळ व उंबर वृक्ष दौंड रेल्वे कामगार मैदानावर पुनर्रोपीत केली. या उपक्रमासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्यक्ष फिल्डवर राहून सर्वांनी मेहनत घेतली व सर्वां समोर एक उदाहरण ठेवले की वृक्ष जपणे व त्याचे संगोपन करणे अत्यंत गरजेचे आहे ,अशा पद्धतीने जुन्या वृक्षांचे पुनर्रोपण केले जाऊ शकते.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता हरिश्चंद्र माळशिकरे, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे पुणे जिल्हाध्यक्ष संदीप शेलार, दौंड नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक शाहू पाटील आदींनी या मोहिमेला साथ दिली.
सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी रोहित त्रिभुवन, संजय सोनवणे, अमोल जगताप, अनिस पठाण, इमरान नालबंद, राहुल मार्कड, अभिजीत उबाळे, प्रथमेश कदम, दादा पळसे, इरफान सय्यद, रिजवान पटेल, बाळू कोळी, रुपेश क्षीरसागर, राजू त्रिभुवन आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.