लोणी काळभोर : सहकारनामा ( रियाज शेख)
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी स्कूल इंजीनिअरिंगच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी प्रिंस कुमार सिंह याची प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत २६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी एसीसी कंटीजंटमध्ये निवड करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होणारा हा एमआयटी एडीटी विद्यापीठाचा दुसरा विद्यार्थी आहे. २०२० साली झालेल्या संचालनात कॅडेट अनय विक्रम मुळिक या विद्यार्थ्याची निवड झाली होती.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत राजपथावर होणाऱ्या संचलनात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला आहे. राजपथावर संचलन करण्यासाठी माझी निवड व्हावी यासाठी मी पूर्ण क्षमतेने सरावात सहभाग घेतला होता. ही निवड माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी असल्याची भावना कॅडेट प्रिंस कुमार सिंह यांनी व्यक्त केली. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याची निवड झाली, ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. विद्यापीठातील इतर मुलांना ही प्रेरणादायी घटना आहे.
एमआयटी मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनीता कराड, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंगच्या अधिष्ठाता डॉ. रजनीश कौर बेदी, डॉ. रेखा सुंगधी यांच्यासह सर्व विभागाच्या डीन, डायरेक्टर आणि शिक्षकांनी कॅडेट प्रिंस कुमारचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.