‘या’ कारणामुळे दोन चिमुकल्या मुलांची हत्या करून महिलेने पतीलाही जीवे मारण्याचा केला प्रयत्न

दौंड : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील उच्चशिक्षित आईने आपल्या चिमूरड्या मुला, मुलीचा गळा दाबून निर्दयीपणे खून केला व झोपेतच असणाऱ्या आपल्या पतीवर सुद्धा तीक्ष्ण हत्याराने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

याप्रकरणी दौंड पोलिसांनी कोमल दुर्योधन मिंढे हिला ताब्यात घेतले असून, हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुर्योधन आबासाहेब मिंढे (पती) उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेत पिऊ दुर्योधन मिंढे (वय २ वर्षे) , शंभू दुर्योधन मिंढे (वय१ वर्षे)  या भावंडांचा मृत्यू झाला आहे. कोमल हिचा घरच्यांशी वाद सुरू होता, याचा तिला मोठा मनस्ताप होत होता. हे सर्व असह्य झाल्याने तिने टोकाचे पाऊल उचलत आपल्या मुला, मुलीचा खून केला व आपल्या पतीलाही संपविण्याचा प्रयत्न केला. ती स्वतःलाही संपवून घेणार होती, आपल्या मृत्यू नंतर मागे आपल्या मुलांचे हाल नको म्हणून तिने आधी मुलांना मुक्त केले अशी माहिती समोर येत आहे.

सदरची घटना शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळी सदर घटनेची माहिती सर्वत्र पसरली, धक्कादायक रित्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण स्वामी चिंचोली परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पत्नीच्या हल्ल्यात गंभीर जखमी असलेला पती खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, सध्या तो घरातूनच काम करीत होता. उच्चशिक्षित कुटुंबातील महिलेने घरगुती वादातून इतके मोठे पाऊल उचलल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची खबर मिळताच दौंड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कुंभार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरख मलगुंडे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. सदर घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.