बारामतीत कोयत्याची दहशत संपेना | एकाला कोयत्याने मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

बारामती :  पुण्यानंतर आता बारामतीमध्ये कोयत्याची दहशत वाढताना दिसत आहे. किरकोळ वादातूनही आता येथे कोयते निघताना दिसत आहेत. किरकोळ असो किंवा घरगुती वाद असला तरी येथे कोयते काढले जात असल्याने पोलिसांनीही आता या कोयता बहाद्दरांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

अशीच एक घटना बारामती शहरात घडली असून बारामती शहर पोलिसांनी यातील आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम 4,25, भारतीय न्याय संहिता 351(2), (3) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत फिर्यादी हुसेन अहमद पठाण (वय 50 वर्षे धंदा कोळसा व्यापार रा. श्रीरामनगर बारामती जि पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अरबाज अजिम ईनामदार (रा. मुक्ती व्हीलेज जुना मोरगाव रोड बारामती ता. बारामती जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 06/02/2025 रोजी सायंकाळी 06:30 च्या दरम्यान बारामती शहरातील श्रीरामनगर  येथे घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.06/02/2025 रोजी सायंकाळी 06:30 च्या सुमारास श्रीरामनगर बारामती येथे आरोपी अरबाज अजिम ईनामदार (रा. मुक्ती व्हीलेज जुना मोरगाव रोड बारामती जि पुणे)  हा श्रीरामनगर बारामती येथे रहाते घरासमोर घरगुती किरकोळ वाद करत असताना फिर्यादीने त्यांना घरगुती वाद घरात जावुन मिटवा असे म्हणालेचे कारणावरुन आरोपीने  धारदार लोखंडी कोयता घेवुन येत फिर्यादीला मारण्यासाठी अंगावर धावुन येवुन जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार  ढोले हे करीत आहेत.