पुणे : पुण्यातून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. शिरीष महाराज यांनी आर्थिक परिस्थितून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण पुण्यावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, हभप शिरीष महाराज यांनी सकाळी 8:30 सुमारास त्यांच्या राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नविन घर बांधले आणि 20 तारखेला होते लग्न
शिरीष महाराज यांनी नुकतेच नविन घर बांधले होते. त्यांचा येत्या 20 एप्रिल ला विवाह होणार होता. मात्र त्या अगोदरच अचानक शिरीष महाराज यांनी आत्महत्या केली. महाराजांनी आत्महत्या केल्याचे समजताच संपूर्ण देहू गावावर शोककळा पसरली. महाराजांनी बांधलेल्या नवीन घरामध्ये खालच्या मजल्यावर त्यांचे आई, वडील रहायचे तर वरच्या मजल्यावर ते स्वतः राहत होते.
काल रात्री शिरीष महाराज मोरे त्यांच्या घरातील वरच्या खोलीत आराम करण्यासाठी गेले होते. सकाळी 8:30 वाजले तरीही ते खाली आले नाहीत त्यामुळे घरातील मंडळींनी वर जाऊन त्यांचा दरवाजा वाजवला मात्र आत मधून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने दारवाजा तोडण्यात आला. यावेळी शिरीष मोरे महाराज यांनी पंख्याला उपरण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उपस्थितांना दिसले.
चिट्ठी लिहून केली आत्महत्या
महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे समोर येत असून या चिट्ठी मध्ये त्यांनी आपण आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिली आहे.