विशेष प्रतिनिधी : नाशिक-गुजरात महामार्गावर खासगी लक्झरी बस सापुतारा घाटातील दरीत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी प्रशासन आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरु असून यातील जमखींना जवळील रुग्णालयात दाखल केले आहे
आज पहाटे ५ च्या दरम्यान नाशिक-गुजरात महामार्गावर असणाऱ्या सापुतारा घाटात ही भयानक घटना घडली आहे. या अपघातातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने जखमींच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार,या बस मधील भाविक देवदर्शनासाठी गुजरातकडे जात असताना हा भयंकर अपघात घडला असून चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस २०० फूट खोल दरीत कोसळली आणि हा अपघात घडला असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.
भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्यानंतर बसचे दोन तुकडे झाले त्यामुळे या अपघाताची भयानकता लक्षात येते. या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बसमधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेशमधील असल्याची माहिती मिळत आहे.