अख्तर काझी
दौंड : दौंड शहरातील संत मदर तेरेसा चौक (नगर मोरी) व सरपंच वस्ती परिसरातील तिरंगा चौकातील जुगार (कल्याण मटका) अड्ड्यांवर दौंड पोलिसांनी छापा मारून, जुगार अड्डा चालविणाऱ्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात मुंबई जुगार कायदा 12 अ अन्वये गुन्हा दाखल केला. राहुल कुमार गायकवाड (रा.गोवा गल्ली ,दौंड), संतोष वामन दरेकर(रा. गोपाळवाडी दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.28 जानेवारी रोजी, दुपारी 12 च्या दरम्यान पोलीस हवालदार नितीन बोराडे यांना माहिती मिळाली की, येथील नगर मोरी चौक परिसरात राहुल कुमार गायकवाड हा लोकांकडून पैसे घेऊन बेकायदा कल्याण मटका जुगाराचे आकडे घेत आहे. खबर मिळताच पोलीस पथकाने त्वरित खाजगी वाहनाने जाऊन त्या जुगार अड्ड्यावर छापा मारला असता त्या ठिकाणी राहुल कुमार गायकवाड हातात कागदी स्लिप घेऊन त्यावर कल्याण मटक्याचे आकडे लिहीत होता.
त्याच्यासोबत असणारा आणखी एक जण पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. ताब्यात घेतलेल्या राहुल कुमार गायकवाड याच्याकडून जुगाराचे साहित्य व रक्कम जप्त करण्यात आली. अशाच प्रकारची दुसरी कारवाई दौंड – गोपाळवाडी रोडवरील सरपंच वस्ती परिसरातील तिरंगा चौकात कल्याण मटका घेणाऱ्या संतोष दरेकर याच्या विरोधात करण्यात आली. याच्याकडूनही जुगाराचे साहित्य व रक्कम जप्त करण्यात आली.
सध्या शहरात गांजा विक्रीचे प्रमाण सुद्धा वाढताना दिसत आहे. शहरातील प्रमुख चौकात गांजा फुकणारे गर्दुल्ले फिरताना आढळतात. येथील भीमा नदी काठावरील काही वीट भट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर गांजा उतरविला जात आहे व तेथून तो विक्रीसाठी शहरातील अनेक एजंटाकडे पाठविला जात असल्याची चर्चा शहरात होत आहे. शहरात उघडपणे गांजा विकणाऱ्या अड्ड्यांवर सुद्धा पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
वरील कारवाई पोलीस उपनिरीक्षक आबनावे, पोलीस नाईक बापू रोटे, पोलीस हवालदार निखिल जाधव, नितीन बोराडे, अमीर शेख, विठ्ठल गायकवाड, सुभाष राऊत, पोलीस कर्मचारी अंकुश दळवी यांच्या पथकाने केली आहे.