दौंड (अख्तर काझी) : देवदर्शन करून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्याने हिसका मारून चोरून नेल्याची घटना दौंड शहरातील रेल्वे स्टेशन जवळील संगम कॉलनी परिसरात घडली आहे. याप्रकरणी लता कृष्णा मोरे (वय 45,रा. पाटील चौक, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा घडलेल्या परिसरात रात्रीच्या वेळेस अनेक प्रवाशांना मारहाण करून लुटण्याच्या घटना सुद्धा घडत असल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दि. 22 जानेवारी रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान शहरातील संगम कॉलनी- हुतात्मा चौक रोडवर घडली आहे. फिर्यादी दि. 22 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातील महादेव मंदिरात दर्शन घेऊन पायी आपल्या घरी जात होत्या, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची नातही होती. साधारणतः सायंकाळी 7 च्या दरम्यान त्या दोघी रेल्वे परिसरातीलच संगम कॉलनी रोडने हुतात्मा चौकाकडे जात असताना काळा टी-शर्ट व निळी जीन्स पॅन्ट परिधान केलेला एक युवक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीवर बसलेला होता. फिर्यादी त्याच्या जवळून जात असताना त्याने अचानक त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतली व तो आपल्या दुचाकीवरून हुतात्मा चौकाच्या दिशेने पसार झाला.
फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्याने समोरच उभ्या असलेल्या दोन मुलांनी दुचाकीवरून चोरट्याचा पाठलाग सुरु केला, परंतु चोरटा त्यांच्या हाती लागला नाही. घटनेची खबर कळताच पो.हवालदार बापू रोटे यांनी तत्काळ काही पोलिसांना त्या ठिकाणी पाठविले. परंतु त्यांना चोरटे सापडले नाही. शहरातील काही भागात व विशेषतः रेल्वे परिसरात, दुचाकीवरून येत महिलांना, रेल्वे प्रवाशांना लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.
या चोरट्यांमुळे महिला वर्गामध्ये घबराटीचे वातावरण आहे. पहाटेच्या वेळेस व सायंकाळच्या वेळेस व्यायामासाठी, फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना हेरून हे चोरटे लक्ष करीत आहेत. एखादी अप्रिय घटना घडण्याआधी या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.