दौंड : दौंड तालुक्यातील वाखारी येथे असणाऱ्या श्री पिरदेव शादावली महाराज देवस्थानच्या शेतजमिनीचा वाद आता चांगलाच चिघळत चालला असल्याचे दिसत आहे. वडिलांच्या मृत्यू नंतर ७/१२ सदरी वहिवाटदार आणि वारसदार म्हणून नावे असलेल्या बहिणींना गेल्या २३ वर्षांपासून या शेतजमिनीत येण्यास, ती कसण्यास आणि पिके घेण्यास मनाई करणाऱ्या भावांविरोधात आता या पीडित बहिणी नितेश राणे यांची भेट घेणार आहेत. भावांनी त्यांची केलेली फसवणूक आणि केलेल्या अन्यायाविरोधात नितेश राणे यांनी लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती या बहिणी करणार असल्याची माहिती यातील मुख तक्रादार शकीला सय्यद यांनी सांगितले आहे.
नेमका प्रकार काय आहे… अनेक वर्षांपासून पीर देव शादावली महाराज देवस्थानची शेत जमीन या ना त्या कारणाने वादग्रत राहत आलेली आहे. या देवस्थानाच्या शेत जमिनीत पिके घेण्यासाठी बहिणींनी विविध मार्गाने न्याय मागण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र एक विक्षिप्त डोके या भाऊ,बहिणींमध्ये आपली शक्कल लढवून बहिणींना कायम त्यांच्या न्याय, हक्कापासून वंचित ठेवत आले आहे. या कुप्रसिद्ध डोक्याचा फटका मागील काळात काही भावांनाही बसला असून जसे वातावरण तशी आपली भूमिका बदलणाऱ्या या डोक्याचा वापर आता बहिणींचा हक्क डावलण्या कामी होऊ लागला आहे. १५ दिवसांपूर्वी भाऊ, बहिणी सामोपचाराने योग्य निर्णय घेतील अशी परिस्थिती असताना पुन्हा या वादात तेल ओतण्याचे काम त्या डोक्याने केले असून त्यामुळे हा वाद आता मंत्री नितेश राणे आणि संबंधित न्यायालयात जाऊन या संपूर्ण शेतजमिनीवर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ‘स्टे’ मिळावा आणि संबंधित विभागाने ही जमीन ताब्यात घ्यावी अशी मागणी या बहिणी करणार असल्याची माहिती शकीला सय्यद यांनी दिली आहे.
अश्या प्रकारे करण्यात आली बहिणींची फसवणूक – मुख्य तक्रादार शकीला सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना व त्यांच्यासोबत असणाऱ्या बहिणींना त्यांच्या भावाने वाखारी येथीक गट नं.५३ मध्ये बोलवून घेतले होते व तुम्हाला तुमची शेतजमीन देतो असे फोनवर सांगितले. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर आपल्या हक्काची शेतजमीन आपल्याला मिळेल या आशेने या बहिणी शेतजमिनीत गेल्या. त्यानंतर या भावांनी पुन्हा एकदा त्यांच्या विरुद्ध लबाडीची डाव अमलात आणत त्यांना खडकाळ व ओढ्याच्या हद्दीत जाणारी जमीन देऊ केली. बहिणी आल्यानंतर लगेच त्या खडकाळ जागेत सिमेंट पोल चे मार्किंग करून बहिणींसोबत फोटो काढण्याची घाई केली. मात्र ही जमीन पूर्णपणे खडकाळ असल्याचे व या मध्ये कोणतीही पिके घेता येणार नसल्याचे या बहिणींच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या भावाला याबाबत प्रश्न केला. मात्र जे मिळतंय ते घ्या, आम्ही अश्याच वाटण्या केल्या आहेत असे उद्धट उत्तर भावाने देऊन पुन्हा एकदा या बहिणींना फसवण्याचा प्रयत्न केला.
बहिणींच्या ही बाब लक्षात आल्यानंतर मात्र त्यांनी यास विरोध करत आम्हाला शेती करता येईल अशी तरी जमीन देण्यात यावी, तुम्ही देत असलेली जमीन ही खडकाळ आणि ओढ्याच्या हद्दीत येत असल्याने यात पिके येणार नाहीत आणि ओढ्याच्या कडेला असणारी खडकाळ जमीन ही भविष्यात ओढा हद्दीत गेल्यास आमच्याकडे काहीच राहणार नसल्याचे सांगितले मात्र तरीही या भावांनी मिश्किल हास्य करून त्यांची चेष्टा केल्यासारखे हीच जमीन घ्यावी लागेल, याच्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला अन्य दुसरी जमीन देऊच शकत नही असे सांगितले. त्यामुळे शेतात बोलवून फक्त फोटो काढायचे आणि फसवणूक करायची असा डाव भावांनी आखल्याचे बहिणींच्या लक्षात आले.
या सर्व फसवणूक प्रकारामुळे या बहिणींनी आता नितेश राणे यांची भेट घेऊन न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असून आमच्या हक्काच्या जमिनीची वाटणी या भावांनी परस्पर कशी करून घेतली आणि आमची नावे ७/१२ सदरी असताना या भावांनी आमचे सुपीक क्षेत्र स्वतःकडे कोणत्या अधिकाराने घेतले, आम्हाला विश्वासात न घेता परस्पर वाटणी करून आम्हाला कसलीही माहिती न देता आपापले ताबे जमिनीत कसे टाकले असे अनेक प्रश्न त्या आता शासन दरबारी मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गेली २३ वर्षे आम्ही आमच्या हक्काच्या जमिनीत पिके घेण्यासाठी लढत असून यामुळे आमच्या भावांनी आम्हाला मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास दिला असल्याचे शकीला सय्यद यांनी सांगितले आहे. या सर्व प्रकाराला आम्ही आता वैतागलो असून पुरुषी अहंकार आणि पुरुषी मानसिकतेने प्रेरित होऊन महिला आणि बहिणींना कमी लेखून त्यांना त्रास देणाऱ्या आणि या जमिनीवर फक्त स्वतःचा हक्क आहे असे म्हणून आपला हेकेखोरपणा दाखवणाऱ्या या भावांविरोधात आता आम्ही तीन बहिणी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायावर त्यांनी लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे सांगत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही न्यायालईन लढाई सुरु राहील आणि या जमिनीबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत माननीय न्यायालयाने या जमिनीवर ‘स्टे’ देऊन ही जमीन संबंधित शासकीय विभागाच्या ताब्यात द्यावी आणि त्या जमिनीबाबत योग्य तो निर्णय व्हावा अशी विनंती करत असल्याचे सय्यद यांनी शेवटी सांगितले आहे.