अख्तर काझी
दौंड : दौंड रेल्वे स्थानकामध्ये धावती गाडी सोडलेल्या लष्करी जवानाचा त्याच गाडीखाली चिरडून मृत्यू झाला असल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. भाऊसाहेब शहानू देवकर (वय 48,रा. शहापूर,ता. नेवासा,जि. अहिल्यानगर(अ. नगर) असे मयत जवानाचे नाव आहे.
दौंड लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा च्या दरम्यान दौंड रेल्वे स्थानक, फलाट क्र. 2 परिसरातील इलेक्ट्रिक पोल क्र.267/3 जवळ घडली. भाऊसाहेब देवकर हे चेन्नई- मुंबई, एस टी टी सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीने प्रवास करीत होते. सदरची गाडी दौंड रेल्वे स्थानकातील फलाट क्र.2 वरून धावत असताना देवकर धावत्या गाडीतून पडले, त्यांच्या डोक्यात जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी नोंद लोहमार्ग पोलिसात करण्यात आली आहे.
मात्र प्रत्यक्षदर्शींच्या मते, सदरची गाडी दौंड रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना तिचा वेग कमी झाला असता देवकर यांनी धावती गाडी सोडली परंतु त्यांच्या पाठीवर असणाऱ्या सामानाच्या बॅग मुळे त्यांचा तोल गेला व ते फलटावर पडत असताना गाडी खाली ओढले गेले त्यामुळे त्यांच्या डोक्यास जबर दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. भाऊसाहेब देवकर लष्करामध्ये नाईक पदावर कार्यरत होते. पोर्ट ब्लेअर( अंदमान- निकोबार) येथून आपली ड्युटी संपवून घरी परत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिसांनी, देवकर यांचा मृतदेह नगरहून आलेल्या संबंधित लष्करी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला.
मुंबईहून दक्षिणेकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या तसेच दक्षिणेकडून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या दौंड रेल्वे स्थानकात थांबत नाहीत. या एक्सप्रेस गाड्यांना दौंड येथे थांबा द्यावा अशी अनेक वर्षापासून प्रवाशांची मागणी आहे. खासदार सुप्रिया सुळे व आमदार राहुल कुल यांनीही रेल्वे प्रशासनाकडे या गाड्यांना दौंड येथे थांबा द्यावा अशी मागणी केलेली आहे. परंतु अद्याप रेल्वे प्रशासनाने सदरच्या गाड्यांना दौंड येथे थांबा दिलेला नाही, परंतु या गाड्या दौंड रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना जर त्यांचा वेग कमी झालेला दिसला तर काही प्रवासी धावत्या गाड्या येथे सोडण्याचा प्रयत्न करतात व अशा जीव घेण्या प्रयत्नातून दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे दौंड रेल्वे स्थानकात थांबा नसलेल्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या ठिकाणी धावती गाडी सोडण्याचा जीवघेणा प्रयत्न करू नये असे आवाहन दौंड लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.