खोरवडी येथे बोटीतून वाळू चोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल, 7 लाखांचा मुद्देमाल जप्त



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यामध्ये वाळू माफियांचे थैमान सुरूच आहे. शासकीय सुट्टी किंवा शनिवार, रविवार असे सुट्ट्यांचे दिवस आले की हे वाळू माफिया सक्रिय होत आपले काळे कारनामे करण्यासाठी सक्रिय होतात. मात्र आता पोलिसांनीही या वाळूमाफियांना आपल्या रडारवर घेतले असून वाळू चोरी करणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

असाच काहीसा प्रकार दि.२६ जानेवारी रोजी सायंकाळी ४:३० ते ६ च्या दरम्यान खोरवडी (ता.दौंड) या  गावच्या हद्दीत घडला असून यातील आरोपीने बेकायदा, बिगरपरवाना यांत्रीक बोटीच्या साहाय्याने अवैध्यरित्या वाळु उत्खनन करीत असताना पोलिसांनी अचानक तेथे छापा मारून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 

परंतु पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन गेला असुन त्याच्या जवळ असणारी यांत्रिक बोट त्यासोबत असणारे सात सेक्शन पाईप, मोठे इंजिन व वायरूप असा ७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

वाळू चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव दत्तात्रय कांबळे असे असून त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अमोल गवळी यांनी फिर्याद दिल्याने  आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.