अख्तर काझी
दौंड : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी केलेल्या विधानाचा आंबेडकरी जनतेच्या वतीने देशभर निषेध नोंदविला जात आहे.
शहा यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अमित शहा यांच्या वक्तव्याचे दौंड मध्येही पडसाद उमटले. असून शहा यांच्या निषेधार्थ, आज दि. 21 डिसेंबर रोजी येथील दलित संघटनांच्या वतीने शहरातून संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले.
शहरातील डॉ.आंबेडकर चौकातून रॅलीला प्रारंभ करण्यात आला, दौंड पोलीस स्टेशन समोरील संविधान स्तंभासमोर रॅलीची सांगता करण्यात आली. रॅलीमध्ये सर्वच दलित संघटनांचे पदाधिकारी, संविधान प्रेमी तसेच भीमसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी आंबेडकरी चळवळीतील प्राध्यापक बी.वाय. जगताप यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. उपस्थित भीमसैनिकांनी अमित शहा यांच्या धिक्काराच्या घोषणा यावेळी दिल्या व अमित शहा यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला.