पहिल्याच हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी विविध मागण्या करत सभागृह गाजवले

नागपूर : राज्यातील निवडणुका संपून सरकार स्थापन झाल्यानंतर या सत्रातील पहिलेच हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरु आहे. या अधिवेशनात दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील विविध विषयावर आमदार राहुल कुल यांनी मुद्दे मांडून सभागृह गाजवले आहे.

पहिला प्रश्न उपस्थित करताना त्यांनी, सध्या दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यात वाढत असलेला बिबट्याचा प्रादुर्भाव व बिबट आणि मानव यांच्यातील वाढता संघर्ष लक्षात घेता शासनाने तातडीने उपयोजना कराव्यात व दौंड तालुक्यातील कडेठाण येथील बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यूमुखी पडलेल्या स्व. लता धावडे यांच्या कुटुंबियांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली.

तर खडकवासला कालवा ते फुरसुंगी बंदी नळी कालवा सुमारे २२०० कोटींचा प्रकल्प तसेच जुना मुठा उजवा कालवा (बेबी कॅनॉल) चे काम तातडीने पूर्ण करावे, मुळशी धरणाचे पाणी पूर्वमुखी वळविण्यात यावे, जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना बंद नळीतून करण्यात यावी, पुरंदर उपसा अंतर्गत खुपटेवाडी फाट्याची पुनर्रचना करण्यात यावी, पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने नदी जोड प्रकल्प, कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प तातडीने आदी प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यात यावी ही दुसरी मागणी केली.

पुढे त्यांनी पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठी असून, एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी मोठा कालावधी वाहतूक कोंडीमुळे लागत आहे त्यासाठी आवश्यक असलेल्या पुणे रिंग रोडचे काम गतीने पूर्ण करावे अशी मागणी करत
ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेल्या तरुण पिढीला बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना राबविणे आणि कुरकुंभ, ता. दौंड येथील MIDC मध्ये सापडलेल्या MDF ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करावी ही मागणीही केली.

राज्याच्या ग्रामीण भागातील नकाशावर समाविष्ट नसलेल्या रस्त्यांना शासनाकडून कोणत्याही निधी तरतुद नाही. ग्रामीण रस्त्याला निधी देण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे, माझ्या दौंड तालुक्यातील अनेक रस्ते आजही नकाशात नसल्याने त्यांना निधी मिळत नाही, त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जोन्नात करण्यासाठीचा प्रस्ताव मागील अनेक दिवसापासून ग्रामविकास विभागात प्रलंबित आहे त्याला तात्काळ मान्यता द्यावी ही मागणी केली.

सायबर गुन्हेगारीच्या विळख्यात अनेकजन अडकलेले आहेत, यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सायबरचे मुख्यालय स्थापन करावे तसेच यामध्ये बळी पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तातडीने मदत मिळण्यासाठी उपाययोजना करणे,
उद्योगातील प्रदूषित पाण्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण, त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे तसेच जमिनीचा पोत देखील खराब होत आहे. तसेच कुरकुंभ, ता. दौंड येथील केमिकल कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने जागरूक राहून काम करावे प्रदूषण करणाऱ्या कंपन्यावर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली.

शेवटी त्यांनी दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेती ही उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रावर अवलंबून असल्याने उन्हाळ्यात या भागात दुष्काळ पडतो त्यामुळे या भागात बुडीत बंधारे बांधावेत तसेच चिबड जमीनीचे निर्मुलन करण्यासाठी शासनाने उपयोजना कराव्यात अशा पद्धतीच्या विविध मागण्या सभागृहात चर्चे दरम्यान केल्या.