पोलिस कोठडीत भीम सैनिकाचा मृत्यू, दलित संघटनांकडून पुकारलेला दौंड बंद यशस्वी

अख्तर काझी

दौंड : परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची समाजकंटकाकडून तोडफोड करण्यात आली, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर दगडफेक करण्यात आली. या संतापजनक घटननेविरोधात आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकांवर तेथील पोलीस प्रशासनाने लाठीमार केला, अटक सत्र सुरू केले आणि या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला असा आरोप करीत भीम सैनिकांवर झालेल्या अन्यायाविरोधात आज दि. 17 डिसेंबर रोजी दौंड बंद ला चांगला प्रतिसाद मिळाला.

दौंड बंद आंदोलनाला शहरातील व्यापारी वर्गाने शंभर टक्के पाठिंबा देऊन आपली दुकाने बंद ठेवली त्यामुळे दौंड बंद आंदोलन यशस्वी होऊन शांततेत पार पडले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये झालेल्या सभेमध्ये दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, भीमसैनिकाच्या मृत्यूस पोलीस प्रशासन व राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांचा तीव्र शब्दात धिक्कार करीत निषेध नोंदविला. तसेच आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या व्यापारी वर्गाचे त्यांनी आभार मानले. यावेळी संघटनांच्या वतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी तसेच पोलीस प्रशासनाने सुरू केलेले कोंबिंग ऑपरेशन व अटक सत्र थांबवून महिला व विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे तत्काळ मागे घ्यावे. पोलिसांच्या कारवाईमध्ये बंदी केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी. चौकशी निष्पक्ष होण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती गठन करावी. भीमसैनिकांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी बुद्ध वस्तीमध्ये शांतता समितीची बैठक घेऊन भयभीत समाजाला विश्वास द्यावा. बेरोजगार तसेच शिक्षण घेणारे युवक पोलीस कारवाईच्या भीतीने मानसिक तणावात आहेत, त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून परभणी सोडून गेलेल्यांना परत येण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने करावे अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. दौंड शहर व तालुक्यातील सर्वच दलित संघटना, भीमसैनिक आंदोलनामध्ये सहभागी होते.