Big News : 2 हजार लोकांची 15 कोटींची ऑनलाइन फसवणूक, तर 48 देशांतील 27 हजार लोकांसोबत ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या चौघांना पुण्यातून अटक



पुणे : सहकारनामा

जगामध्ये असणाऱ्या 48 देशांतील 27 हजार लोकांना ऑनलाईन पद्धतीने लुटणाऱ्या 4 आफ्रिकन नागरिकांना पकडण्यात मुंबई सायबर पोलिसांना यश आले असून या ठगांना पुण्यातून अटक करण्यात आली असल्याची माहिती सहा.पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) मिलिंद भारंबे यांनी दिली आहे.

त्यांनी या घटनेबाबत अधिक माहिती देताना सांगितले की साधारण एक महिन्यापूर्वी सायबर पोलिसात हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करणाऱ्या एका व्यक्तीने तक्रार दिली होती की  त्याने नोकरीसाठी आपला बायोडाटा बर्‍याच वेबसाइटवर टाकला होता.  काही दिवसांनंतर त्याला फोन आला आणि फोनवर पुढील व्यक्तीने सांगितले की तुमचा बायोडाटा पाहिल्यानंतर त्याला कॅनडाच्या हिल्टन हॉटेलमध्ये मॅनेजमेंट (व्यवस्थापक) ची नोकरी दिली जात आहे. कॉलकरणाऱ्याने त्याच्या ईमेल आयडीवर हिल्टन हॉटेलचे अपॉईंटमेंट लेटर देखील पाठवले होते.  या नंतर काही दिवसांनी त्यांनी या व्यक्तीला  वेगवेगळी कारणे सांगून सुमारे 17 लाख रुपये वेगवेगळ्या बँकांमध्ये ट्रान्सफर करण्यास सांगितले आणि पुढेही त्यांची मागणी वाढत गेल्यानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याचे या व्यक्तीच्या लक्षात आले.

पोलिसांकडून सायबर सेल ला हि तक्रार मिळाल्यानंतर सायबर पोलिसांच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी एक पथक तयार करून त्यांच्याकडून या प्रकरणातील सर्व बँक खाती व फोन लोकेशनची माहिती घेतली. मात्र तरीही त्यांना त्यामध्ये त्यांच्या हातात फारसे काही लागले नाही. मात्र तरीही पोलिसांनी हार न मानता एक विशेष तंत्रज्ञानाचा आधार घेत आरोपींचे लोकेशन मिळवले आणि त्यानंतर एक पथक पुण्यात पाठवून आरोपींना अटक करण्यात आली.

या प्रकरणावर प्रकाश टाकताना उपायुक्त भारंबे यांनी सांगितले की तपासणी दरम्यान आरोपी नोकरीच्या साईटवरून लोकांचा बायोडाटा गोळा करायचे आणि त्यानंतर सर्वांना फोन करून नोकरीच्या नावाखाली त्यांची फसवणूक करत असायचे. यामध्ये जर एखादी व्यक्ती त्यांच्या भेटीला आली तर ते वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून थोडे थोडे करून पैसे उकळायचे.  या आरोपींनी आत्तापर्यंत अंदाजे 15 कोटींहून अधिक रुपायी फसवणूकीतून कमावले असल्याचे आता समोर येत आहे.

पोलिसांनी तपास करताना त्यांना असे आढळले की हे लोक गुन्ह्यावेळी लोकांकडून पैसे घेण्यासाठी 48 बँक खात्यांचा वापर करत होते.  ही खाती दिल्ली, उत्तर प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि आसामच्या बँकांमध्ये आहेत हे विशेष.

या बँक खात्यांमध्ये दोन परदेशी बँक खाती असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली असून  यातील एक खाते दुबई तर दुसरे नायजेरियामध्ये आहे. या दोन खात्यांमध्ये या आरोपींनी आतापर्यंत 10 कोटींपेक्षा जास्त रक्कम ट्रान्स्फर केल्याचेही समोर आले आहे.हस्तांतरित केली आहे. तर भारतातील बँक खात्यांमध्ये पोलिसांना पावणेतीन कोटींची उलाढाल झाल्याचे निदर्शनास आले आहे.

या आरोपींकडून 14 मोबाईल फोन, 2 लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि अनेक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त केली असून यामध्ये पोलिसांना 48 देशांतील 27000 लोकांचा डेटा मिळाला आहे. तर हार्ड डिस्कमध्ये सुमारे 2700 लोकांच्या स्कॅन केलेल्या पासपोर्टच्या प्रतीही पोलिसांना सापडल्या आहेत. आरोपींच्या म्हणण्यानुसार यातील सुमारे 2 हजार लोकांची त्यांनी फसवणूक केल्याचे म्हटले आहे.