हैदराबाद : पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये एका थिएटर मध्ये झालेल्या चेंजराचेंगरीत महिलेच्या मृत्यू झाला होता. संध्या असे या थिएटर चे नाव असून येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.
पुष्पा २ च्या प्रीमियर वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याला आरोपी बनवण्यात आले आहे. अल्लू अर्जुन हा 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये न सांगता पोहोचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तो अचानक त्या थिएटर मध्ये गेल्यामुळे तेथे मोठी गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेत अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापन अल्लू अर्जुन आणि त्यांच्या सुरक्षा पथकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमनेही महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता. अभिनेत्याने मृत रेवतीच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आणि त्यांची भेट घेतली. अभिनेत्याने 25 लाखांची मदत देण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र पोलिसांनी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करून हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी सर्वप्रथम अल्लू अर्जुनला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी उस्मानिया रुग्णालयात नेण्यात येणार आहे.
नेमके प्रकरण काय आहे..? अल्लू अर्जुनविरुद्ध बीएनएस कलम १०५, ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे अजामीनपात्र कलम आहे. अल्लूचा वैयक्तिक अंगरक्षक संतोष यालाही पोलिसांनी अटक केली आहे. वास्तविक, अल्लू अर्जुन ४ डिसेंबरला न सांगता संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आला होता. त्यामुळे चाहते अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी उत्सुक होते. त्याच्यासोबत मोठ्या संख्येने चाहत्यांनी थिएटरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थिएटरमध्ये मोठी गर्दी जमली आणि त्यानंतर लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. गर्दी कमी झाल्यानंतर गुदमरल्यामुळे बेशुद्ध झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.