आरोग्यदुताची हॅट्रिक… चार खासदार नडले पण ‘जनतेच्या’ जोरावर ‘राहुल कुल’ जोरात भिडले.. ‘राहुल कुल’ तिसऱ्यांदा ‘आमदार’

दौंड (अब्बास शेख) :  दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांची तिसऱ्यांदा दौंडच्या जनतेने आमदारपदी निवड केली आहे. साधारण 13,906 हजार मतांनी राहुल कुल हे विजयी झाले आहेत. माजी आमदार रमेश थोरात हे सलग तिसऱ्यांदा आमदार राहुल कुल यांच्याकडून पराभूत झाले आहेत. राहुल कुल यांना पराभूत करण्यासाठी दौंड तालुक्यात चार चार खासदारांनी ताकद लावली मात्र जनतेने राहुल कुल यांचे कार्य लक्षात घेत त्यांना तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून दिले असल्याचे दिसत आहे.

दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दौंड विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे संपूर्ण तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. माजी आमदार रमेश थोरात यांना शरद पवारांचे तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर निवडणुकीत मोठी चूरस पहायला मिळत होती त्यामुळे आज दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच प्रत्येकजण निवडणूक निकालाची आतुरतेने वाट पाहत होता. यावेळी विद्यमान आमदार राहुल कुल की माजी आमदार रमेश थोरात हे विजयी होणार यावर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आपलाच उमेदवार विजयी होईल असा दावा केला होता.

आज सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर हळू हळू निकालाची दिशा स्पष्ट होऊ लागली. आमदार राहुल कुल यांना राहू बेट पासून सुरु झालेले लीड माजी आमदार रमेश थोरात यांना शेवटपर्यंत तोडता आले नाही. तसेच ज्या ज्या गावात रमेश थोरात समर्थकांनी आपल्याला मोठे लीड मिळेल असा दावा केला होता तो दावाही जनतेने फोल केल्याचे दिसत कहे. दौंड तालुक्यातील जनतेने पुन्हा एकदा विकास कामांना प्राधान्य दिल्याचे येथे पहायला मिळाले.

आमदार राहुल कुल यांनी आरोग्य यंत्रनेच्या माध्यमातून केलेली कामे, दौंड तालुक्यात झालेली विकासकामे, भीमा पाटस कारखाना पुन्हा सुरु झाल्याने सुखावलेला शेतकरी वर्ग तसेच लाडकी बहीण योजना ही राहुल कुल यांच्या जमेची बाजू ठरली तर शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे मिळालेले तुतारी चिन्ह, जनतेमध्ये भीमा पाटस कारखान्या प्रति करण्यात आलेला नकारात्मक प्रचार आणि संपूर्ण तालुक्यात राहुल कुल यांना हुकूमशहा दाखविण्याचा प्रयत्न येथे जनतेने निष्फळ केल्याचे दिसले.

आमदार राहुल कुल हे तिसऱ्यांदा विजयी झाल्याने  दौंड तालुक्याला मंत्रिपद मिळणार यात शंका राहिलेली नाही. त्यामुळे आता कधी एकदा सरकार  स्थापन होते आणि राहुल कुल हे मंत्रिपदाची शपथ घेऊन कधी एकदाचा लाल दिवा तालुक्यात फिरतो येतात याकडे  संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.