पुणे : सहकारनामा
चाकण येथे ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने ‘तुला अक्कल नाही का? असे म्हटल्याच्या रागातून एका कंटेनर चालक आणि त्याच्या मित्राने या पोलिसाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्यास बेशुद्ध केल्याची घटना घडली आहे.
नामदेव रवींद्र करवंदे असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते चाकण वाहतूक विभागात कार्यरत आहेत. करवंदे हे तळेगाव चाकण चौकात दुपरच्यावेळी आपले काम करत असताना तेथे वाहनांची कोंडी होऊ लागली त्यामुळे त्यांनी तेथे उभा असलेला कंटेनर पाठीमागे घेण्यास सांगून कंटेनर चालकाला ‘तुला अक्कल नाही का?’ असे ओरडले होते.
या प्रकारामुळे वाहतूक पोलीस करवंदे आणि आरोपीमध्ये शाब्दिक वादही झाला. मात्र वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने अक्कल काढल्याचा राग आल्याने यातील दोन आरोपींनी करवंदे हे ड्युटीवर असताना दुचाकीवर येऊन त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड ने प्रहार केला. यावेळी पोलीस कर्मचारी करवंदे हे मार लागल्यानंतर जमिनीवर कोसळून बेशुद्ध पडले. जवळ असणाऱ्या नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाहून त्यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
हि संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.
आरोपी रोहित बाबू साळवी आणि हर्षदीप भारत कांबळे (सम्राट अशोक बिल्डिंग समोर, कल्याण, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना अटक करण्यात आले आहे.