Sahkarnama News Effect ‛सहकारनामा’ न्यूज ‛इफेक्ट’ : दौंड’मध्ये वाहन चालकांकडून दादागिरीने पैसे वसूल करणाऱ्या तृतीय पंथीयांचा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी 48 तासातच केला बंदोबस्त



दौंड : शहरातील अष्टविनायक मार्गावरील संत मदर तेरेसा (नगर मोरी) चौकामध्ये तृतीय पंथीय टोळी प्रत्येक वाहन चालकांकडून दादागिरीने खंडणी गोळा केल्या प्रमाणे पैसे वसूल करीत होते. या टोळी समोर वाहन चालक, स्थानिक व्यापाऱ्यांसह लांब पल्ल्याचा प्रवास करणारे प्रवासी अक्षरशः जेरीस आले होते. या त्रासाबाबत ‛सहकारनामा’ ने परखड वृत्त देत बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची गांभीर्याने दखल घेत दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी 48 तासातच या टोळीचा चांगलाच बंदोबस्त करून त्यांना येथून हद्दपार केल्याचे पहायला मिळत आहे.

तृतीय पंथीय टोळके मुख्य चौकात रस्त्याच्या मधोमध उभे राहुन येणारे – जाणारे प्रत्येक वाहन अडवून वाहन चालकांना दादागिरी करीत पैसे वसूल करीत होते. पैसे नाकारणाऱ्या वाहन चालकांना अश्लील हावभाव करून शिवीगाळ करीत त्यांच्याकडून बळजबरीने पैसे घेतले जात होते. हा सर्व अश्लील प्रकार दौंडमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळत होता. वाहन चालकांकडून होणाऱ्या पैशाची लूट भर दिवसा व पोलिसांसमोर होत असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. स्थानिकांसह पोलिसही या टोळक्या समोर हतबल झाल्याचे दिसत होते. ‛सरकारनामा’ ने बातमीच्या माध्यमातून हा चाललेला किळसवाणा प्रकार समोर आणला. त्याची पो. नि. घुगे यांनी तत्परतेने दखल घेतली व पोलिसांना या मुजोर टोळक्यांना येथून हद्दपार करण्याच्या सूचना केल्या.

घुगे यांच्या आदेशानंतर 48 तासातच पोलिसांनी या टोळीला तंबी देत त्यांना दौंड मधून हूसकावून लावले आहे. दौंड पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करीत स्थानिक रहिवासी, वाहन चालक, व्यापारी आणि प्रवाश्यांनी पो.नि. घुगे व पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.