बहुजनांचा बुलंद आवाज ‘वंचित’ चे उमेदवार  ‘बादशहा भाई’ यावेळी तरी बहुजनांचा मान राखणार का !

दौंड : दौंड तालुक्यात दौंड शहराला अनन्य साधारण असे महत्व आहे आणि या शहरात चार-पाच नेते मंडळी अशी आहेत की त्यांच्याशिवाय दौंड शहराचे नावच पूर्ण होत नाही आणि त्यातीलच एक नाव म्हणजे बादशहा भाई शेख. सर्वसामान्य, गोरगरिबांचा मसीहा म्हणून त्यांची ओळख आहे. कित्येक वर्षे ते दौंड नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून येत असून त्यांनी नगराध्यक्षपद सुद्धा भूषविले आहे.

बादशाहभाई सध्या वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी उभे राहुन ‘कुल आणि थोरातांच्या’ राजकीय अस्तित्वाला जणू आव्हानच दिले आहे. कारण बादशहा शेख यांना फक्त मुस्लिम आणि दलित समाजच नव्हे तर दौंड तालुक्यातील विविध जाती धर्माचे लोक सुद्धा मानतात त्यामुळे त्यांच्या उमेदवारीने कुल-थोरात यांना अनपेक्षित धक्का बसू शकतो अशी चर्चा नागरिक करताना दिसत आहेत.

शेख यांच्यामागे हिंदू, मुस्लिम, दलित, ख्रिश्चन असा मोठा वर्ग त्यांच्यामागे उभा राहत आला आहे आणि आपली ताकद दाखविण्याची बादशहा भाईंची हीच खरी वेळ आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीमध्ये भाईंनी निवडणुकीला सामोरे जावे आणि भूल, थापांना, इमोशनल ब्लॅकमेलिंग ला बळी पडून आपले अस्तित्व गमावू नये अशी अपेक्षा दौंड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला त्यांच्याकडून आहे.

निवडणुका जवळ आल्या की भाई फॉर्म भरणार, कुणीतरी तरी त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर हात टाकणार, नंतर भाई त्यांना गाडीवर बसवून गावभर फिरवणार अण तहसील कचेरीत जाऊन ते सहज फॉर्म माघारी घेणार असा काहीसा गवगवा त्यांचे विरोधक आत्तापासूनच तालुकाभर करू लागले आहेत. त्यामुळे आतातरी बादशहा भाईंनी राजकीय कटकारस्थान ओळखून आपले अस्तित्व अबाधित राखण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज म्हणून निवडणुकीला सामोरे जावे अण विजय संपादन करून विरोधकांना ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून द्यावे अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला त्यांच्याकडुन आहे.