राहू (दौंड) : येणारा काळ हा दौंड तालुक्याचा आहे, दौंड तालुक्याला महाराष्ट्राच्या नकाशावर महत्वाचं स्थान मिळावं यासाठी मी कटिबद्ध आहे. तुमची खंबीर साथ आणि अढळ विश्वास असाच माझ्यासोबत ठेवा हे शब्द आहेत दौंडचे आमदार राहुल कुल यांचे. ऐकायला हे शब्द सर्वसामान्य वाटतं असले तरी या स्वाभिमानी शब्दांमध्ये खूप काही दडले आहे.
मागील काळात चोहो बाजूनी फक्त बारामतीचा विकास दिसत असायचा मात्र आता दौंड तालुक्याने सुद्धा कंबर कसल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे आमदार राहुल कुल यांच्या त्या शब्दांना अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. बारामतीपेक्षा एक इंच तरी जास्तच तालुक्याचा विकास हा पुढे ठेवायचा असा जणू प्रणच आमदार राहुल कुल यांनी घेतल्याची सध्याची परिस्थिती दिसत आहे. आ.कुल यांच्या विशेष प्रयत्नांतून प्रांत कार्यालय आणि जिल्हा न्यायालय दौंडमध्ये आले आहे. बेबी कॅनॉल सुरु झाले, प्रधानमंत्री आवास योजनेचा हजारो लोकांना लाभ मिळाला, आरोग्य निधी मार्फत तर त्यांनी संपूर्ण राज्यात रेकॉर्ड ब्रेक असे कार्य केले आहे त्यामुळे लोकांनी आमदार कुल यांच्यावर टाकलेला विश्वास आता सार्थ होऊ लागल्याचे प्रत्येक गावागावातील नागरिक चर्चा करताना दिसत आहेत.
गेली अनेकवर्षे फक्त बारामती अण बारामतीच विकासामध्ये पुढे दिसायची दौंड तालुक्याचा क्रमांक विकासाच्या मुद्द्यावर खूप खाली ठेवला जायचा. याचं खरं कारण म्हणजे दौंडचा आवाज हा बारामतीच्या पुढे दाबला जायचा. याच सर्व कळीच्या मुद्द्यावरून कुल यांना वेळोवेळी संघर्ष करावा लागला. मात्र या सर्व घडामोडीत आ.राहुल कुल यांना खऱ्या अर्थाने भाजप ची खंबीर साथ मिळाली. राहुल कुल यांनी कामे सांगायची आणि राज्य आणि केंद्राने ती मंजूर करायची अशी काहीशी परिस्थिती अलीकडच्या काळात तयार झाली. त्यामुळे दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकास निधी उपलब्ध होऊन वीज, रस्ते, पाणी, भीमा पाटस कारखाना, शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी याबाबतच्या सर्व अडचणी दूर झाल्या. ज्यांना प्रांत कार्यालयीन कामासाठी पुरंदरला जावे लागत होते ते त्यांची आता तालुक्यात सोय झाली. ज्यांना मोठ्या केससाठी बारामतीला जावे लागत होते त्यांनाही आता तालुक्यातच जिल्हा न्यायालय आल्याने बारामतीला जाण्याची गरज उरली नाही.
विरोधक टिका, टिप्पणीत व्यस्त असताना आ.कुल यांनी मात्र विकासाच्या मुद्द्यावर भर देत जी कामे मार्गी लावली त्याचा निकाल हा दौंडला झालेल्या गर्दीतून दिसून आला. त्यामुळे आता आ.राहुल कुल यांनी, येणारा काळ हा दौंड तालुक्याचा आहे, दौंड तालुक्याला महाराष्ट्राच्या नकाशावर महत्वाचं स्थान मिळावं यासाठी मी कटिबद्ध आहे. तुमची खंबीर साथ आणि अढळ विश्वास असाच माझ्यासोबत ठेवा याचा जो उच्चार केला आहे त्यामागे दौंडला पुढील काळात सुवर्ण काळ मिळवून देण्यासाठी सुरु असलेली धडपड स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे येणारा काळ हा दौंडसाठी सुवर्णकाळ असेल आणि त्यासाठी जनतेने पुन्हा एकदा योग्य तो निर्णय घेण्याची गरज मात्र नक्कीच आहे.