पुणे : महाविकास आघाडीकडून मुस्लिमांच्या हक्काच्या मतदार संघात मुस्लिमांना उमेदवारी नाकारल्याने पुण्यातील मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत येथील मुस्लिम समाज लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती मुस्लिम राजकीय मंच चे अंजुम इनामदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अंजुम इनामदार यांनी माहिती देताना, काही वेळापूर्वी शरदचंद्र पवार गटाचे एकूण 44 लोकांची यादी जाहीर करण्यात आली. त्या एकुण यादीमध्ये आष्टी मधून फक्त मेहबूब शेख या एका मुस्लिमाला उमेदवारी देण्यात आली आहे मात्र उर्वरित यादीमध्ये इतर मुस्लिमांचे नाव दिसून येत नाही. महाराष्ट्रात असलेल्या मुस्लिमांच्या लोकसंख्यानुसार वास्तविक पाहता त्यांना सत्तेत भागीदारी दिली पाहिजे ही भावना गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सतत मुस्लिम समाजबांधव मांडत आलेले आहेत. मुस्लिमांना सत्तेत भागीदारी देण्याकरिता खुद्द पद्मविभूषण खासदार पवार साहेब यांची पुणे शहरातील नामवंत मुस्लिम धर्मगुरूंनी व सामाजिक संघटनांनी साधारण तीन वेळा बैठक घेतली होती.
त्या बैठकीत मुस्लिम बांधवांनी एकच आग्रह केला होता की पुणे शहरात असलेल्या 21 विधानसभा मतदारसंघांपैकी किमान एक तरी विधानसभा मतदारसंघातून मुस्लिमांना उमेदवारी द्यावी. हडपसर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाज बांधवांची लोकसंख्या चांगली असल्याने त्या ठिकाणी महाविकास आघाडीने जर उमेदवारी दिली तर नक्कीच मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकतो. गेल्या 40 वर्षांपूर्वी सन 1980 ते 1985 पुण्यामधून फक्त एकच मुस्लिम आमदार निवडून गेले होते. त्यानंतर यंदा चांगली संधी असल्याने मुस्लिमांना उमेदवारी देऊन समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी मुस्लिम समाजाची मागणी होती.
ज्या समाजाने महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत भरभरून मते दिली त्या मुस्लिम समाजाला विधान परिषद ची जागा सुद्धा दिली नाही. मात्र तरीही मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिला. हडपसर विधानसभा मतदार संघ हा एकमेव असा मतदार आहे की ज्या ठिकाणी मुस्लिम लोकसंख्या जवळपास 1 लाख 15 हजार पेक्षा जास्त असल्याने त्या ठिकाणी सहज मुस्लिम उमेदवार निवडून आला असता, मात्र त्याही ठिकाणी शरदचंद्र पवार गटाने प्रशांत जगताप यांचे नाव जाहीर करून मुस्लिमांचा हक्काचा मतदारसंघ हिसकावला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाला डावलून इतरांना तिकीट देणे म्हणजे मुस्लिम समाजाचा विश्वासघात करण्यासारखे आहे असा आरोप मुस्लिम राजकीय मंचाचे नेते अंजुम इनामदार यांनी केला आहे.
याबाबत लवकरच पुणे शहरातील सर्व पंथाचे मुस्लिम धर्मगुरू, सामाजिक संघटना, प्रतिष्ठित कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविले जाणार आहे. मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी डावलने हा मुस्लिम समाजावर केलेला अन्याय आहे आणि आता हा अन्याय मुस्लिम समाज सहन करणार नाही असा इशारा मुस्लिम राजकीय मंचाचे वतीने देण्यात आला आहे.