दौंड : पत्रकार म्हटले कि समाजातील वाईट प्रवृत्तींचा पर्दाफाश करणारा, वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवणारा, चांगल्या कामांना आपल्या बातमीत स्थान देणारा, वाईट झाले तर वाईट अण चांगले केले तर चांगले लिहिणारा लेखक म्हणजे पत्रकार. मात्र या पत्रकाराची जागा ज्यावेळी एक कुत्सित मेंदू घेतो त्यावेळी त्याला सर्वत्र फक्त वाईटच दिसू लागते. मग त्याची लेखणी सुद्धा वेडेवाकडे अण बाष्पळ लिखाण करण्यात आपली धन्यता मानू लागते. अश्या लिखान बहाद्दरांना कितीही चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्या चांगल्या वाटत नाहीत. कारण त्यांना फक्त चुक, वाईट अण टिका इतक्याच गोष्टी लिहिण्यात, पाहण्यात आनंद मिळत असतो. अण लेखणी बहाद्दरांना मग चार चौघात अपमानाला ज्यावेळी सामोरे जावे लागते त्यावेळी संबंध पत्रकारांचा अपमान झाला असा आकांडा तांडव सुरु होतो.
मग मात्र प्रश्न हा उपस्थित होतो कि खरंच तुम्ही पत्रकारितेची मूल्ये जपली आहेत का..? पत्रकारिता म्हणजे काय आहे हे समजून घेतले का..? कि कुणी मान दिला म्हणून त्या मानाला भीती समजून पुढील व्यक्तीवर काहीही छापून त्याची निंदा नालस्ती करायची अण पुढील व्यक्तीने औकात दाखवली कि मग मात्र आकांडा तांडव करायचा हि पत्रकारीता मुळीच नाही. पत्रकारितेचा अर्थ सर्वसामान्य जनता, लोकांनी निवडून दिलेले नेते अण शासन दरबारी काम करणारे अधिकारी यांच्यावर दबाव टाकणे, हुकूमत गाजवणे, त्यांच्यावर शिंतोडे उडवणे हा नाही तर सर्व सामान्य जनतेच्या अडचणी ऐकून, समजून घेऊन त्या शासन दरबारी आदराने, योग्यरीतीने मांडून त्यांना न्याय मिळण्यासाठी सहकार्य करणे हा आहे.
भडक लिखाण, तुच्छ, उच्च नीच असे लिखाण म्हणजे पत्रकारीता मुळीच नाही तर तारतम्य बाळगून, विषय नीट समजून घेऊन, भाषेची अभ्यासपूर्वक मांडणी करून वर्तमान गोष्टी सहज, सोप्या भाषेत मांडणे अण चांगले अण वाईट या गोष्टी सभ्य भाषेत लिहिणे म्हणजे पत्रकारिता मूल्य जपने हे आहे. मात्र काही महाभागांकडून आजूबाजूला कितीही चांगले झाले तरी ते कसे वाईट आहे हे दाखविण्याचा जो केविलवाणा प्रयत्न होत राहतो त्यास पत्रकारितेच्या नावावर ‘धब्बा’ इतकेच म्हणणे योग्य राहील.
उदा. एखाद्या रुग्णाला इंजेक्शन देण्याची गरज असते त्यावेळी डॉक्टर त्याला इंजेक्शन देतात अण ते इंजेक्शन दिल्याने तो रुग्ण बरा होतो, मात्र हे लिखान बहाद्दर महाभाग या घटनेतील मुख्य उद्देश बाजूला सारून ‘पहा त्या निर्दयी डॉक्टरने बिचाऱ्या एका रुग्णाला किती निर्दयीपणे सुई त्याच्या दंडात घुसवली, त्या बिचाऱ्याचा जीव काय म्हणाला असेल.. हा डॉक्टर नसून हैवान आहे असा जावई शोध या कुत्सीत मेंदू मधून लिखानाच्या स्वरूपात बाहेर येतो. अश्या लिखाण बहाद्दरांना मग चांगल्या मानसिकतेचे लोक, नेते मंडळी आणि अधिकारीही वाईट मानसिकतेचे वाटू लागतात अण हि मंडळीही मग अश्या लोकांना टाळू लागतात.
लिखाण बहाद्दराचा ‘मी पणा’, अहंकार, मी आहे तर कोणी नाही, मलाच सर्व समजते या गोष्टी त्याच्या चांगुलपणाला संपवून त्याला समाजात विलन करून टाकतात. मग चांगले लिहिणारे या बहाद्दरांना भक्त किंवा गुलाम वाटू लागतात. मात्र त्यांची स्वतःची बुद्धी हि केव्हाच वाईट विचारांची गुलाम बनलेली असते हे त्यांच्या लक्षातही येत नाही. मी लिहिले, मी टिका केली, मी नावे ठेवली हे मी उत्तम केले अण दुसऱ्याने वर्तमान हकीकत मांडली, सत्य मांडले म्हणजे ते गुलाम झाले असा काहीसा गोड गैरसमज हा त्यांच्या मनात घर करून राहतो अण अश्याच प्रकारे एकेकाळी चांगल्या लेखणीने नावाजलेले लिखाण सम्राटही समाजात वाईट प्रवृत्तीचा लेखक म्हणून आपल्या लेखणीच्या घटका मोजताना दिसू लागतात.