पुणे : सहकारनामा
ज्या भागातील उद्योजक देशाचे स्वच्छता दूत म्हणून नेमले जातात त्या मांजरी भागात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत व पालिकेच्या राजकीय साठमारीत ग्रामस्थांना त्रास कशाला? 15 दिवसांत कचरा उचलला नाही तर महापौरांच्या निवासस्थानी कचरा फेकणार असा इशारा मांजरीच्या माजी ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी महेश नलावडे यांनी दिला आहे.
मांजरी ग्रामपंचायत महापालिकेत समावेश केला आहे, पालिकेने अद्याप गावांचा समावेश प्रक्रिया केलेली नाही, ग्रामपंचायतीने जबाबदारी झटकून कचरा उचलने बंद केले तर पालिकेने दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते महेश नलावडे, मंदाकिनी नलावडे व कार्यकर्ते कचऱ्याच्या ढिगात बसले व तीव्र शब्दांत निषेध केला.
यावेळी पितांबर धीवार, कुलदीप यादव, अशोक पोळ, श्रीपाद घुले, राजू तावरे, आशा पाटील, विमल पाटील, रोहिणी गरड, विजया पोळ, उषा माळी, लता खबाले सुपे ताई उपस्थित होते.
जगाला नवसंजीवनी ठरणारी कोरोना लस जेथे निर्माण होते त्या मांजरी, महादेवनगर परिसरात कचऱ्याचे साम्राज्य, वाहतूककोंडी, अपुरा पाणीपुरवठा अशा एक ना अनेक समस्या असताना राज्यसरकार, पालिकेतील व ग्रामपंचायत मधील भाजप सत्तेच्या स्वार्थासाठी राजकारण करीत आहेत या गोष्टींचा आम्ही निषेध करतो, तातडीने कचरा उचलून नागरी सुविधा पुरविल्या नाही तर 1 हजार नागरिक – महिलांसह रस्त्यावर उतरणार असा इशारा महेश नलावडे यांनी यावेळी दिला आहे.