..अण अपघातातील जखमी युवकांना रस्त्यावरच सोडून पोलीस निघून जातात तेव्हा, दौंड शहरातील गंभीर घटना

अख्तर काझी

दौंड : अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोहचून अपघातातील जखमिंना त्वरित रुग्णालयात पोहचवीने हे पोलीस आणि उपस्थित लोकांचे कर्तव्य असते. अनेकवेळा अश्या अपघातस्थळी पोलीस पोहचून लोकांची मदत मागून एखाद्या वाहणातून जखमिंना रुग्णालयात घेऊन जाण्याचे प्रकार आपण पाहत आलो आहोत, मात्र लोकांनी आग्रह करूनही पोलीस आपल्या वाहणातून किंवा पर्यायी वाहणातून अपघातातील जखमिंना घेऊन न जाता उलट तेथून निघून जात असतील तर मग सर्वसामान्य लोकांनी मदत माघायची तरी कोणाकडे असा सवाल उपस्थित होतो. असाच प्रकार काल रात्री दौंड शहरात उघडकीस आला आहे.

तर झालं असं, दौंड शहरातून नवरात्रीचा दांडिया पाहून मुले दुचाकीवरून घरी जात असताना दौंड येथील शिवाजी चौकात त्यांचा अपघात झाला. आंबेडकर चौकाच्या दिशेने आलेल्या कारची व पोलीस स्टेशनच्या दिशेने आलेल्या दुचाकीची शिवाजी चौकात धडक झाली. कारच्या धडकेत दुचाकीवरिल मुले रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानासमोरील खड्ड्यात फेकली गेली. अपघाताचा झालेला आवाज ऐकून परिसरातील युवकांनी त्या ठिकाणी धाव घेतली, पडलेल्या मुलांना उचलून बाहेर आणले. त्यांना कोठे मार लागला आहे का हे पाहिले. तेव्हा दोन मुलांना मुका मार लागलेला होता. परंतु एकाच्या डोक्याला मार लागलेला दिसत होता. डोक्याच्या पाठीमागे जखम होऊन त्यातून रक्तस्त्राव होत होता. हे पाहून बरे वाईट होऊ नये म्हणून जखमी मुलाला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी जमलेल्या युवकांनी धावपळ सुरू केली.

त्याचवेळी त्या ठिकाणी दौंड पोलिसांची रात्रीच्या गस्तीची गाडी आली. गाडीतून एक पोलीस कर्मचारी खाली उतरले, अपघात होऊन मुले रस्त्यावर पडले आहेत हे त्यांनी पाहिले. पोलिसांची गाडी आलेली आहे हे पाहून युवकांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला विनंती करत तुमच्या गाडीतून या जखमी मुलाला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जावु अशी विनवणी केली. तेव्हा त्या पोलिसाने या गोष्टीला नकार दिला आणि ही गाडी रात्रीच्या गस्तीची आहे असे म्हणत तेथून निघून गेले. हा सर्व प्रकार पाहून ज्या कार ने अपघात झाला होता त्याचा चालक आपल्या गाडीतून मुलांना दवाखान्यात घेऊन जाण्यास तयार झाला. जखमी मुलाला त्या गाडीतून उपचारासाठी खाजगी दवाखान्यात घेऊन जाण्यात आले व भरती करण्यात आले.

आपले मंत्री, खासदार ,आमदार यांच्यासमोर जर एखादा अपघात झाला व अपघातात जर कोणी जखमी झाले आहे असे त्यांना दिसले तर ते स्वतः त्या जखमींना आपल्या गाडीतून उपचारासाठी दवाखान्यात नेवुन मदत करतात. येथे तर पोलिसांची गाडी, जी लोकांच्याच मदतीसाठी असते त्या पोलिसांनी मात्र जखमी मुलाला मदत करण्यास नकार दिला. सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे पोलीस काहीही न करता तेथून निघून गेले. दवाखान्यात येऊन त्यांनी जखमी मुलाला पाहण्याचे सुद्धा सौजन्य दाखविले नाही. परंतु अपघातातील कारचा फोटो काढायला मात्र ते विसरले नाहीत. रात्रीच्या गस्तीची गाडी आहे म्हणून त्या गाडीतून अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी शासनाची बंदी आहे का? जर वेळीच उपचार मिळाला नसता आणि त्या युवकाचे बरे वाईट झाले असते तर त्या गोष्टीला पोलिसही तितकेच जबाबदार नसते का..? असा प्रश्न येथील उपस्थित नागरिक करत होते.