अख्तर काझी
दौंड : शहरातील नियोजित शासकीय कत्तलखाना जमीन दोस्त करावा या मागणीसाठी दि. 7 ऑक्टोबर रोजी, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मुस्लिम धार्मियांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आल्याने या वक्तव्यांचा निषेध म्हणून उद्या बुधवार दि.9 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता निषेध मूक मोर्चा काढण्यात येणार आहे
दौंड शहरातील नियोजित शासकीय कत्तलखाना जमीन दोस्त करावा या मागणीसाठी दि. 7 ऑक्टोबर रोजी दौंड शहरामध्ये मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या मोर्चाची सांगता सभा घेण्यात आली होती. यावेळी अनेकांनी या ठिकाणी भाषणे केली. यावेळी व्यासपीठावर रामगिरी महाराज, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग आदी उपस्थित होते. रामगिरी महाराज व सागर बेग यांनी आपल्या भाषणामध्ये मुस्लिम धर्मियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याच्या व त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यासाठी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे निवेदन मुस्लिम समाजाच्या वतीने दौंड पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.
शहरातील शासकीय कत्तलखाना पाडण्याची मागणी करीत मोर्चाचे व सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु कत्तलखाना पाडण्याच्या नावाखाली रामगिरी महाराज यांनी समस्त मुस्लिम समाजाचे धर्मगुरू, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नाव न घेता त्यांनी पूर्वी केलेल्या वक्तव्याची पुनरावृत्ती केली. पैगंबराच्या प्रतिमेस ठेच पोहोचविणारे अपशब्द वापरले. सागर बेग यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील असे वादग्रस्त वक्तव्य केले. याचा निषेध नोंदविण्यासाठी मूक मोर्चा चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी दिली.