National Highway : चौफुला-केडगाव – नाव्हरा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करून रस्त्याचे रुंदीकरण व्हावे – आ.कुल यांची महामार्ग मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी



पुणे : सहकारनामा

चौफुला – केडगाव – नाव्हरा या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करून रस्त्याचे रुंदीकरणाचे काम प्राधान्याने करण्यात यावे अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे-सोलापूर महामार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी आमदार राहुल कुल यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुढीलप्रमाणे मागण्या केल्या आहेत.

राष्ट्रीय प्राधिकरणाद्वारे न्हावारा- केडगाव चौफुला राज्य मार्ग – ११८ (किमी १६/ ८०० ते ४१/७०० – लांबी २४ किमी ) चा भारतमाला प्रकल्पात समावेश करण्यात आला परंतु अद्याप तो राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केलेला नाही. हा रस्ता  पुणे – मुंबई, पुणे – नाशिक, पुणे- अहमदनगर, पुणे-सोलापूर आणि पुणे- सातारा आदी राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतो तेव्हा न्हावरा – केडगाव चौफुला रस्ता राज्य मार्ग – ११८ (किमी १६/ ८०० ते ४१/७०० – लांबी २४ किमी ) हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा व या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम प्राधान्याने करण्यात यावे. 

तसेच पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव येथील भुयारी मार्ग तसेच दौंड तालुक्याच्या विविध गावांच्या हद्दीतुन जाणाऱ्या अनेक ठिकाणी प्रलंबीत असलेल्या सर्व्हिस रोड बाबत आपल्या निवेदनाची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास पुढील कार्यवाहीच्या सूचना याआधी केल्या असून सर्व्हेचे काम पूर्ण होताच तात्काळ कामाला सुरुवात करण्यात यावी. अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.

याबाबत विविध विषयांवर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली असून योग्य कार्यवाहीचे करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले आहे.

पुणे – सोलापूर महामार्ग हा पुण्यालगत दाट लोकवस्ती असलेल्या गावातून जातो विशेषत शेवाळवाडी, लोणी काळभोर, थेऊर फाटा, उरुळी कांचन इत्यादी गावांमध्ये मोठी लोकसंख्या आहे व या ठिकाणी महामार्गावरील जंक्शनमध्ये वाहतुकीची कोंडी, गर्दी ज्यामुळे बर्‍याच वेळा अपघात होतात. 

रस्ते सुरक्षेसाठी आणि या ठिकाणी घडणारे अपघात, इजा आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी या भागातील महामार्गावरील मुख्य जंक्शनवर ओव्हर ब्रिज उभारण्यात यावेत तसेच पुणे-सोलापूर महामार्गवर दाट लोकवस्ती असणारे व अपघात प्रवण क्षेत्र ओळखून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी देखील आमदार राहुल कुल यांनी गडकरी यांचेकडे केली आहे