पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना घेण्यासाठी जाणारे हेलिकॉप्टर पुण्यातील बावधानमध्ये कोसळले. ही घटना आज २ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.४५ च्या दरम्यान घडली आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी हिंजवडी पोलिसांनी केली आहे.
पुण्यातील या भागात मोठ्या प्रमाणावर धुके असल्यामुळे हे हेलिकॉप्टर टेकऑफ नंतर बराचवेळ आकाशात घिरट्या घालत होतं आणि त्यानंतर ते क्रॅश होऊन जमिनीवर कोसळलं. या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आणायला निघाले होते. ते आज या हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते अशी माहिती मिळत आहे. पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघालेल्या या हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड गोल्फ क्लब हेलिपॅडवरून टेकऑफ केले होते. मात्र काही वेळातच हे हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालून थेट जमिनीवर कोसळले.