दौंड: सध्या शहरामध्ये बाहेरगावाहून उंटवाले आले आहेत, हे उंटवाले बच्चे कंपनीला उंटावरून फेरफटका मारून मिळालेल्या पैशातून आपली उपजीविका करतात. परिसरात आलेले उंट पाहून लहान मुलेही उंटावर बसण्यासाठी पालकांकडे हट्ट करतात. म्हणून पालक वर्ग ही उंटवाल्यांच्या भरवशावर आपली मुले त्यांच्या हवाली करतात. याच संधीचा फायदा घेत एका नराधम उंट वाल्याने चिमुकल्या मुलीचा विनयभंग केला असल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांनी नराधमाला व त्याच्या साथीदारांना पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. दौंड पोलिसांनी तीन उंट वाल्यांच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
जिगर नाना चव्हाण, सनी नाना चव्हाण, प्रथमेश महेंद्र साळवे (रा. चिंचोडी ,नाशिक) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास दौंड गोपाळवाडी रोड परिसरात घडली आहे. परिसरामध्ये उंटस्वार आला होता, त्यामुळे फिर्यादी यांच्या नातीने उंटावर बसण्याचा हट्ट केला. त्यामुळे फिर्यादी यांनी नातीला उंटावर बसविले. उंटस्वार नातीला चक्कर मारायला घेऊन गेला.
चक्कर मारून झाल्यावर त्याने चिमुकलीला आजोबाकडे सोडले व दुसऱ्या मुलीला चक्कर मारायला घेऊन गेला. दरम्यान आजोबाने नातीला विचारले की तुला चक्कर मारण्यासाठी इतका उशीर का झाला, तेव्हा तिने सांगितले की उंट वाल्याने तिला आडबाजूला घेऊन गेला होता व त्याने तिच्या कमरेखाली हात घातला होता.
हे ऐकल्यावर फिर्यादी आजोबा यांनी आपल्या नातलगांच्या मदतीने उंट वाल्याला पकडले व पोलिसांच्या हवाली केले. त्याच्या दोन साथीदारांनी ही परिसरातील लहान मुलांच्या बाबतीत असेच गैरवर्तन केले असल्याचे समजल्याने त्यांनाही पकडण्यात आले.