दौंड : शहरातील महिला, मुलींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोंचा बंदोबस्त करण्यात येणार आहे आणि त्या करिता दौंड पोलीस स्टेशनला सहा. पोलीस निरीक्षक दर्जाची महिला पोलीस अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. महिलांची, मुलींची छेडछाड रोखण्यासाठी असलेल्या निर्भया पथकाचे त्या नेतृत्व करणार आहेत. फक्त सण आणि उत्सवांच्या दरम्यानच नाहीतर कायमच नागरिकांच्या जीवितांचे व मालांचे रक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि ते आमचे कर्तव्यच आहे. आम्ही ते करतच राहणार आहोत अशी ग्वाही पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.
गणेशोत्सव, पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. बारामती विभागाचे अप्पर पो. अधीक्षक गणेश बिरादार, नव्याने पदभार स्वीकारलेले दौंड चे उपविभागीय पो. अधिकारी बापूसाहेब दडस, सासवडचे उपविभागीय पो. अधिकारी बरडे, दौंडचे पो. निरीक्षक संतोष डोके, सासवडचे पो. निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस पाटील आदि उपस्थित होते.
बैठकीमध्ये उपस्थितांनी शहर व ग्रामीण भागातील समस्यांचा पाढा वाचला. शहरातील रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यात यावा, बेवारस जनावरांचा, पार्किंगचा प्रश्न मार्गी लावावा, शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, महिला -मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचार घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांची व्याख्याने ठेवावीत, ग्रामीण भागातील चोरट्यांचा बंदोबस्त करावा, शहरातील सरपंच वस्ती येथे पोलीस चौकी द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
नागरिकांनी केलेल्या सूचना, तक्रारी व मागण्यांबाबत बोलताना पंकज देशमुख म्हणाले की, गणेशोत्सव, पैगंबर जयंती अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पडतील यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. सध्या उडणाऱ्या ड्रोन संदर्भात बऱ्याच अफवा आहेत त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा ड्रोन चा बंदोबस्त करण्यासाठी अँटी ड्रोन गन्स साठी पैशाची तरतूद करण्यात आली आहे. या गन्स मिळाल्या की ड्रोन पाडण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाणार आहे. परंतु नागरिकांना आमचे आवाहन असणार आहे की, कुठल्याही अफवेला बळी पडू नका. काय तरी आकाशात चमकते आहे म्हणून कोणीतरी चोरीच करणार आहे किंवा कोणीतरी टेहळणी करत आहे अशा अफवांना खतपाणी घालू नका.
शहरात गोहत्या होत आहेत अशी माहिती काहींनी दिली, अशा घटना जर होत असतील तर तक्रारीसाठी पोलीस प्रशासनाच्या 112 नंबरचा वापर करावा. या ठिकाणी जनावरांची अवैध कत्तल होत असेल तर पोलिसांना कळवा निश्चितपणे कारवाई केली जाईल. ग्रामीण भागात चोरांचे प्रमाण वाढले आहे अशी माहिती काहींनी दिल्याने देशमुख म्हणाले की, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, पुढील 8-10 दिवसात तुम्हाला परिस्थिती बदललेली दिसेल. शहरात परप्रांतीय मोठ्या प्रमाणावर आले आहेत, असे तुम्ही सांगत आहात मात्र या भारत देशामध्ये घटनेने अधिकार दिलेला आहे की, कोणाला कुठेही राहता येईल व जाता येईल परंतु असे असले तरी त्यांची नोंद होणे आवश्यक आहे. असेही देशमुख म्हणाले.